You are currently viewing राज्यस्तरीय गणेश गीत गायन स्पर्धेत सावंतवाडीच्या सद्गुरू संगीत विद्यालयाच्या नितीन धामापूरकर यांचे अभुतपुर्व यश

राज्यस्तरीय गणेश गीत गायन स्पर्धेत सावंतवाडीच्या सद्गुरू संगीत विद्यालयाच्या नितीन धामापूरकर यांचे अभुतपुर्व यश

बांदा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट,पुणे यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गणेश गीत गायन स्पर्धेत सावंतवाडी येथील सद्गुरू संगीत विद्यालयाचे विद्यार्थी श्री नितिन लक्ष्मीकांत धामापूरकर यांनी तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.रोख अकरा हजार रुपये,स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र तसेच शाल श्रीफळ देऊन पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.खास बाब म्हणजे या स्पर्धेमध्ये राज्यभरातून ५००पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते तसेच आयोजकांनी गणेश गीत दिलेले होते .त्या गणेश गीताला चाल लावून स्पर्धेमध्ये गायचे होते. सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक ,गुरुवर्य आदरणीय श्री निलेश मेस्त्री यांनी या गणेश गीताला अमृतवर्षीनी या रागामध्ये संगीतबद्ध केले होते .
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ गायिका आदरणीय सौ अनुराधा पौडवाल ,तसेच ज्येष्ठ गायक आदरणीय श्री सुरेशजी वाडकर ,आदरणीय श्री राहुलजी देशपांडे ,सौ शिल्पा पुनतांबेकर ,सौ गौरी यलवडकर व श्री आनंद कुरेकर हे लाभले होते.या स्पर्धेत प्रथम क्रमांक पुणे येथील दत्ता हरी कदम ,तर द्वितीय क्रंमांक गायत्री येरगुद्दी पुणे,यांनी मिळवला होता.
नितीन धामापूरकर हे सावंतवाडी तालुक्यातील नेमळे विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी आपल्या गायनाचा छंद देखील जोपासला आहे.या स्पर्धेसाठी हार्मोनियम साथ त्यांचे गुरुवर्य आदरणीय श्री निलेश मेस्त्री,तर तबला साथ श्री किशोर सावंत व नीरज भोसले यांनी दिली होती .धामापूरकर यांच्या घवघवीत यशाबद्दल नेमळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री आ.भि. राऊळ, मुख्याध्यापिका सौ बोवलेकर ,श्री संजय कात्रे ,श्री विजय कारेकर , श्री पांडुरंग दळवी ,चंद्रहास हिर्लेकर ,श्री राजस शेणई तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

अभिप्राय द्या..