You are currently viewing गरजू आजीला ‘बाल भजन मंडळ’ यांच्याकडून भजनातून जमलेल्या पैशांतून मदत..

गरजू आजीला ‘बाल भजन मंडळ’ यांच्याकडून भजनातून जमलेल्या पैशांतून मदत..

मालवण /-

देव चराचरात असतो, असं म्हणतात. आणि लहान मुलांत तर त्याचं अस्तित्व प्रकर्षाने जाणवतं. याचंच एक सुंदर प्रत्यंतर मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे दिसून आलं आहे. गणेश चतुर्थीच्या काळात भजन करत बालगोपालांच्या चमूने आपल्या मेहनतीने काही पैसे गोळा केले आणि या भजनातून जमलेल्या रकमेतून एका वृध्द आजीला मदत करत समाजासमोर एक सुंदरसं उदाहरण ठेवलंय. सलग तिसऱ्या वर्षी या मुलांनी भजनातून जमलेल्या रकमेतून गरजू वृद्धेला मदत करत समाजासमोर पुन्हा एकदा एक आदर्श प्रस्थापित केला.

तारकर्ली गावातील रोहन नरेश कांदळगावकर, यज्ञेश वंदन केरकर , वेदांत सदाशिव सागवेकर, ईशान सदाशीव सागवेकर, प्रणित भार्गव कांदळगावकर, निनाद गणपत मोंडकर, रिषभ श्रीधर खराडे, हार्दिक सतिश टिकम, सिद्धेश नरेश टिकम, नैतिक धोंडी कांदळगावकर,‌ रोहित बाळकृष्ण वरक, देवेश पराडकर या बाळगोपाळांची ही ‘भजन पार्टी’. गणेशोत्सवाच्या काळात आपल्या बालभजन मंडळा मार्फत भजन करत आपल्या कलेला वाव देणं, हे यांचं काम. पण ही समाजाची आणि आपल्या सामाजिक जबाबदारीची उत्तम जाण असणारी मुलं आपल्या कृत्यातून सलग तीन वर्ष समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित करत आहेत. भजनातून गोळा झालेल्या निधीमधील काही भाग ते समाजातील गरजू व्यक्तींना मदत स्वरूपात देत आहेत. यावर्षी तारकर्ली गावातील श्रीमती मीना महादेव बटा या गरजू महिलेस या बालगोपालांनी भजनातून जमा झालेल्या निधीतील काही रक्कम देत तिच्या संसाराला आपल्या प्रेमाचा टेकू दिला आहे. त्यामुळे कोरोना काळात आर्थिक भार सोसत असलेल्या या आजीचा भार काही प्रमाणात हलका झाला आहे. याआधीही या बाळगोपाळांनी रवि टिकम या आजारी तरूणाला आर्थिक मदत केली होती. तसेच गावातील निराधार आणि गरजू महिलांनाही आपल्या वाट्यातला काही भाग देत मदत केली होती. बालचमुच्या या सामाजिक जाणीवेचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कामानिमित्त सौदी अरेबिया येथे वास्तव्यास असलेल्या प्रदिप तोंडवळकर यांनी ५००० रूपयांचे प्रोत्साहनात्मक बक्षिस पाठवले होते. आपल्या नकळत्या वयातसुद्धा अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असलेल्या या ‘बाल भजन मंडळाचे’ सर्वत्र कौतुक होत आहे. आणि खरंच, आपल्या भजन सेवेतून ईश्वर सेवा करणाऱ्या या बालगोपालांनी ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हे व्रत अंगिकारत समाजसेवेचा हा जोपासलेला वारसा सर्वांनाच अनुकरणीय असा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा