कुडाळ /-

निसर्ग साधन संपत्तीने समृद्ध अशी ओळख असलेल्या माणगाव खोऱ्याला अलीकडील काळात बेकायदा दारू विक्री,मटका,जुगार अशा अवैध धंद्यांचे ग्रहण लागले होते. जिल्ह्यातील बेकायदा व्यवसायां विरोधातील मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे मागील दोन महिन्यांच्या कालावधीत माणगाव खोऱ्यात अशा धंद्यांना चाप बसविण्यात स्थानिक पोलीस प्रशासन यशस्वी ठरू लागले होते.मात्र प्राप्त माहितीनुसार माणगांवातील बेकायदा व्यावसायिकांच्या टोळीने संबंधित अधिकाऱ्याच्या बदलीसाठी जोरदार फिल्डिंग लावली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत बदलीसाठी दबाव आणत आहेत अशी चर्चा माणगाव खोऱ्यात जोर धरू लागली आहे.
दारू, मटका व जुगार अशा बेकायदा धंद्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन बनत असून अनेक संसार उध्वस्त होत आहेत.त्यामुळे अशा व्यवसायांवर आळा बसणे काळाची गरज असून प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्याप्रती निष्ठा जपल्याने दोन महिन्यांतच “बदलीची” बक्षिसी दिली जात असेल तर ही बाब पोलीस कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारी आहे. मनसे यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असून बदलीची कार्यवाही न थांबवल्यास वेळ प्रसंगी कुडाळ पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन करेल असा इशारा मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page