You are currently viewing कणकवली तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन वात्सल्य’ योजनेंतर्गत बैठक संपन्न..

कणकवली तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन वात्सल्य’ योजनेंतर्गत बैठक संपन्न..

तालुक्यातील ५४ लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने घेतला आढावा

कणकवली /-

‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार कोरोनामुळे पालक, कर्तापुरूष दगावलेल्यांसाठी ‘मिशन वात्स्यल्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत तहसीलदार आर. जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज तालुकास्तरावरील पहिली बैठक संपन्न झाली. तालुक्यात या योजनेत पात्र ठरणारे ५४ लाभार्थी असून त्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला.

कणकवली तालुक्यात मिशन वात्सल्य या योजनेंतर्गत एकूण ५४ लाभार्थी आहेत. यात कोरोनाच्या संसर्गामुळे दोन्ही पालक दगावलेले अनाथ मुले, बालक, घरातील कर्ते पुरुष गेल्याने विधवा महिला, एकपालक गमावलेली मुले अशांचा यात समावेश आहे. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसीलदार असून यात तालुका शिक्षण अधिकारी, तालुका विधी सेवा प्राधिकारण, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी, पशुसंवर्धन अधिकारी, तालुका संरक्षण अधिकारी अशांचा समावेश आहे.

दरम्यान अशा लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देणे, त्यासाठीचे प्रस्ताव तयार करणे, पाठपुरावा करणे, तालुकास्तरीय सभा प्रत्येक आठवड्याला आयोजित करावयाची आहे. यातून त्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावयाचा आहे. यात कुटुंब निवृत्तीवेतन योजना, शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, एलआयसी, बँक खाते, आधारकार्ड, जन्म मृत्यू दाखला, जातीचे प्रमाणपत्र, मालमत्ता विषयक हक्क, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाम योजना, श्रावणबाळ योजना, बालसंगोपन योजना, अनाथ बलकांचे शालेय प्रवेश फी, घरकुल योजना, कौशल्य विकास, राष्ट्रीय निवृत्ती विषयक योजना, शुभ मंगल सामुहिक योजना, अंत्योदय योजना, आदिवासी विकास योजना, कृषी लाभाच्या योजना अशा योजनांबाबतचे लाभ मिळवून द्यावयाचे आहेत. या अनुषंगाने तहसीलदार आर. जे. पवार यांनी आढावा घेतला. तसेच प्रत्येक पात्र लाभार्थ्याला संबंधीत लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाहीच्या सूचनाही दिल्या. तसेच यापुढे प्रत्येक आठवड्याला बैठक आयोजित करण्यात येणार त्यावेळी खातेप्रमुखांनी स्वतः उपस्थित राहावे. अन्यथा नोटीस काढण्यात येईल, असा इशाराही तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिला आहे.

अभिप्राय द्या..