पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ‘या’ उमेदवारांसाठी आनंदाची बातमी!

मुंबई /-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवासी पोलीस शिपाई भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सरकारकडून मोफत निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

योजनेच्या निकष व स्वरुपात आणि अटी व शर्तीमध्ये बदल करुन ३ महिन्यांच्या कालावधीचे निवासी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबतची योजना यापुढे राबविण्यात येईल.

नव्या योजनेची वैशिष्ट्ये :

निवड केलेल्या प्रशिक्षण संस्थामार्फत अल्पसंख्याक समुदायातील किमान 12 वी इयत्ता उत्तीर्ण युवक/युवतींना पोलीस भरतीपूर्व ३ महिन्यांच्या कालावधीचे निवासी प्रशिक्षण देण्यात येईल.
▪️ उमेदवारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी, तसेच त्यांच्याजवळ महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र हवे.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये किमान 25 व कमाल 50 प्रवेश संख्येची एक तुकडी व अल्पसंख्याक बहुल 11 जिल्ह्यांमध्ये किमान 25 व कमाल 50 प्रवेश संख्येच्या दोन तुकड्या याप्रमाणे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येईल.

25 पेक्षा कमी संख्येने उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेश घेतल्यास अशा जिल्ह्यात प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार नाही.
▪️ प्रत्येक तुकडीमध्ये 30 टक्के जागा महिला उमेदवारांकरिता राखीव राहील. महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास या जागा पुरुष उमेदवारांकरिता वापरात येतील.

प्रशिक्षणादरम्यान काय सुविधा मिळणार?

महिला व पुरुष प्रशिक्षणार्थींना स्वतंत्र निवास व्यवस्था, स्वच्छ स्वच्छतागृह, चहापान, अल्पोपहार, दोन वेळचे पोटभर जेवण, प्रसिद्ध प्रकाशकांची पोलीस भरतीविषयक अद्ययावत 2 पुस्तके, 2 वह्या, 1 पेन 1 पेन्सिल, तसेच तीन सराव परिक्षांसाठी आवश्यक असलेली लेखन सामग्री. अल्पसंख्याक समुदायातील लोकांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नती यामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी सरकारचा हा खटाटोप सुरु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा