You are currently viewing मोती तलावात उडी घेतलेल्या तरुणाचा सापडला मृतदेह.;बाबल आल्मेडा रेस्क्यू पथकाचे यश..

मोती तलावात उडी घेतलेल्या तरुणाचा सापडला मृतदेह.;बाबल आल्मेडा रेस्क्यू पथकाचे यश..

सावंतवाडी /-

आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी मोती तलावात उडी घेतलेल्या तरुणाचा शोध घेण्यास अखेर यश आले. परंतु त्याचा मृतदेह आढळून आला. संबंधीत तरुण हा उभाबाजार परिसरात राहणारा असून प्रविण कमलाकांत केसरकर (४५), असे त्याचे नाव आहे. बाबल अल्मेडा रेस्क्यू टीमच्या माध्यमातून ही शोध मोहीम राबविण्यात आली होती.

संबंधित तरुणाने दुपारच्या सुमारास मोती तलावात उडी घेतल्याचे तेथील काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध कार्य सुरु केले होते. त्याची दुचाकी व चप्पल तलावाकाठी आढळून आल्याने त्याने तलावातच उडी घेतल्याची खात्री पटली होती. त्यामुळे तात्काळ पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी त्याचा तलावात शोध घेतला. मात्र त्यांना अपयश आल्याने बाबल आल्मेडा रेस्क्यू पथकाला त्याठिकाणी पाचारण करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेला अखेर सायंकाळी यश आले. दरम्यान संबंधिताचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या शोध मोहिमेत बाबल आल्मेडा रेस्क्यू पथकाच्या पास्कू देसा, सांतान आल्मेडा, सहदेव सनम, फ्रान्सिस डिसोझा आदी सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

अभिप्राय द्या..