You are currently viewing ऑनलाईन फसवणूक बचावासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी.;ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आवाहन..

ऑनलाईन फसवणूक बचावासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी.;ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आवाहन..

वैभववाडी /-

चोरी, घरफोडी, तस्करी, फसवणूक हे शब्द नित्याचेच बनलेले आहेत. दूरदर्शन, वर्तमानपत्रे व व्हाट्सअपवर अनेक प्रकारे फसवणूक झाल्याचे मेसेज आणि बातम्या पाहावयास मिळतात. आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून बचावासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. पैसे दामदुप्पट करणे, पैशाचा पाऊस पाडणे, दागिने पॉलिश करणे व लॉटरीच्या आमिषातून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होताना दिसत आहे. अशा प्रकारचा दागिने पॉलिशचा बहाणा करून वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे कडूवाडी येथील महिलांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस आल्यामुळे दोघा परप्रांतीयांना पकडले आहे. अशा फसवणूक प्रकारामध्ये विशेषतः महिलावर्गाची फसवणूक होताना दिसते. आपल्या घरी आलेल्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून दागिने पॉलिशला देणे चुकीचा आहे. आपल्या ओळखीच्या खात्रीशीर सोनाराकडे जाऊन असे व्यवहार करणे अपेक्षित आहे. तसेच सध्या ऑल इंडिया सिम कार्ड व्हाट्सअप लकी ड्रॉ चा मेसेज फिरत असून रुपये पंचवीस लाख बक्षीस लागले असून फक्त 8870882433 या नंबर वर संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले आहे. या लकी ड्रॉ मध्ये सुद्धा अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

अशा अनोळखी व्यक्तींचा संशय आल्यास फोटो काढावा तसेच गावातील पोलीस पाटील, सुजान नागरिक यांना कल्पना द्यावी. तसेच जवळच्या पोलिस स्टेशनची तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, उपाध्यक्ष एकनाथ गावडे, संघटक सीताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव संदेश तुळसणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा