दोडामार्ग येथील संजय जाधव यांचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू..

दोडामार्ग येथील संजय जाधव यांचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू..

दोडामार्ग /-

दोडामार्ग शहर बाजारपेठेत भाजी विक्री करणारे संजय जाधव वय 52 यांचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती मेहुणे पत्रकार जय भोसले यांनी दिली. ‘लय भारी’ अशी आरोळी देत बाजारपेठेत लक्ष वेधून घेत भाजी विक्री करणारे संजय जाधव यांच्या जाण्याने बाजारपेठेत हळहळ व्यक्त होत होती. जाधव हे मूळ बेळगाव मधिल बेळबुंदी येथील असले तरी अलीकडील काही वर्षात त्यांनी दोडामार्ग शहरात भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता.
दोडामार्ग गांधी चौकातून तिलारीच्या दिशेने पंचायत समिती इमारतीच्या अगदी समोर जाधव दाम्पत्य भाजी विक्री करतात. गेल्या काही वर्षांपासून भाजी विक्री करणाऱ्या या पती-पत्नींनी सचोटीने व्यवसाय करत नागरिकांमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली होती. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सर्व आस्थापने बंद असताना अत्यावश्यक गरज म्हणून भाजी विक्रीची सेवा जाधव यांनी चोख बजावली. काल-परवापर्यंत शहरात आपल्या नियोजित जागेत ते भाजी विक्री करायचे. विशिष्ट देहबोली व मुखात “लय भारी’ हा शब्द अनेकांना परिचयाचा झाला होता. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने शहरातून हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी दुपारी जाधव यांच्या छातीत दुखु लागल्याने दोडामार्ग रुग्णालयात नेले असता तेथून पुढिल उपचारासाठी ओरोस येथे नेत असताना रुग्णालयाच्या काही मिटर अंतरावरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..