You are currently viewing चिपी विमानतळास ‘ सिंधुदुर्ग एअरपोर्ट’ नाव द्या.;रविकिरण तोरसकर यांची मागणी..

चिपी विमानतळास ‘ सिंधुदुर्ग एअरपोर्ट’ नाव द्या.;रविकिरण तोरसकर यांची मागणी..

मालवण / बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा चिपी येथील विमानतळाचे लवकरच उद्घाटन होत आहे. या विमानतळास सिंधुदुर्ग एअरपोर्ट असे नाव देण्यात यावे अशी मागणी नीलक्रांती पर्यटन संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी केली आहे. चिपी विमानतळावरून नेहमीप्रमाणे श्रेयवाद आणि नामांतर वादाच्या गर्दीत जिल्ह्यात होणार्‍या पहिल्या वहिल्या विमानतळाचा आनंद झाकोळला जाण्याची शक्यता आहे. श्रेयवादाचा विषय बाजूला ठेवला तर नामांतर वाद होण्याची दाट शक्यता आहे. राजकीय लाभ घेण्यासाठी विशिष्ट महनीय व्यक्तींची नावे देण्याची मागणी विविध राजकीय घटकांकडून होत आहे. ज्या विशिष्ट व्यक्तींची नावे देण्याची मागणी होत आहे त्यांचे निःसंशय कोकणच्या विकासात आणि विचारधारेत योगदान आहे. परंतु नामांतराच्या बाबतीत कोकण रेल्वे पॅटर्न राबविणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्र, गोवा, केरळ या तीन राज्यात धावणार्‍या रेल्वेला कोणत्याही महनीय व्यक्ती, युगपुरूष, समाजपुरूष यांचे नाव न देता रेल्वे ज्या भौगोलिक ठिकाणामधून धावत आहे. त्या घटकाचे नाव म्हणून कोकण रेल्वे असे तिचे नामकरण झाले आहे. यामुळे महाराष्ट्रातील, कोकण प्रदेश जगाच्या नकाशावर आला आहे. तसेच रेल्वेच्या सर्व स्थानकांना स्थानिक शहराचे अथवा गावाचे नाव दिले आहे. सन १९९७ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे. त्यानंतर जिल्ह्याने पर्यटनामध्ये भरारी घेतली आहे. ही भरारी उत्तुंग होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नावाचे ब्रँडिंग होण्याची आवश्यकता आहे. सिंधुदुर्गात सुरू होणार्‍या विमानतळाला ’सिंधुदुर्ग एअरपोर्ट’असे नाव दिल्यास राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर ’सिंधुदुर्ग’चे नाव जाणार आहे. भारतातील पर्यटनाचा कानोसा घेतल्यास सिंधुदुर्गाला लागून असलेल्या गोवा राज्याचा बोलबाला राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. खेदाने सांगावेसे वाटते की राष्ट्रीय पातळीवर वावरताना सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख अजूनही गोव्याच्या बाजूचा महाराष्ट्रातील जिल्हा अशी द्यावी लागते. देशी-विदेशी पर्यटक, पर्यटनाचे नियोजन करत असताना किंवा पर्यटन स्थळे शोधण्यासाठी विविध की वर्डचा वापर करत असतात. प्रस्तावित विमानतळास ’सिंधुदुर्ग एअरपोर्ट’ असे नाव दिल्यास ही की वर्ड आपोआप पर्यटकांसमोर येईल. त्यामुळे सिंधुदुर्गातील विविध पर्यटन स्थळे त्याच्या डोळ्यासमोर येतील. याचा निश्‍चितच फायदा सिंधुदुर्गातील पर्यटन वाढीसाठी होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्ग सिंधुदुर्ग या ओळखी वरूनच १९८१ मध्ये रत्नागिरी जिल्हा वेगळ्या झालेल्या आपल्या जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग जिल्हा असे ठेवण्यात आले. गेली साडेतीनशे वर्ष अरबी समुद्रात ठाम उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला सर्वांच्याच अस्मितेचा विषय आहे. भारतातील तसेच परदेशातील विविध विमानतळांची नावे ही तेथील शहराच्या किंवा महत्त्वाच्या ठिकाणावरून अथवा प्रसिद्ध वास्तूवरून दिली आहेत. तोच आदर्श समोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे कार्य जगासमोर आणण्यासाठी तसेच सिंधुदुर्गातील पर्यटनवाढीसाठी चिपी येथे होणार्‍या विमानतळाचे नाव ’सिंधुदुर्ग एअरपोर्ट ’असे ठेवणे संयुक्तिक ठरेल. तसेच नामांतर वादातून पर्यटन वाढीस धोकादायक असणारी सामाजीक अशांतता निर्माण होणार नाही अशी आशाही श्री. तोरसकर यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा