You are currently viewing खारेपाटण येथे एस. टी. बस कलंडली.;सुदैवाने जीवित हानी टळली..

खारेपाटण येथे एस. टी. बस कलंडली.;सुदैवाने जीवित हानी टळली..

कणकवली /-

मुंबई – गोवा महार्गावरून खारेपाटण बाजारपेठ तथा एस. टी. बसस्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीच्या पुढील रस्त्यावर आज सकाळी 11 वाजता राजापूर डेपोची खारेपाटण तळगाव राजापूर वाहन क्र. एम. एच. २० बी. एल- ०३९८ ही एस. टी. बस खारेपाटण बसस्थानकातून सुटल्यानंतर समोरून आलेल्या एस. टी. गाडीला साईड देताना बाजूला कलंडल्याने अपघात झाला. सुदैवाने गाडीत किरकोळ प्रवासी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान सदर अपघात हा खारेपाटण मुख्य रस्त्यावर अवास्तव खाजगी वाहने उभी करून ठेवली असल्यामुळे झाला असल्याचे बोलले जाते.

सध्या गौरी गणपतीचा सण असल्यामुळे मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे आले आहेत. यातच खारेपाटण ही मोठी बाजारपेठ असल्याने आजुबाजुच्या गावातील नागरिक खारेपाटण बाजारपेठेत खरेदीसाठी येत असतात मात्र खाजगी वाहन चालकांना गाड्या उभ्या करण्यासाठी विशिष्ट जागा खारेपाटण ग्रामपंचायतने ठरवून दिल्या असताना देखील खाजगी वाहन चालक खारेपाटण बाजरपेठेत व बसस्थानकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करून ठेवतात. त्यामुळे खारेपाटण बसस्थानकाकडे जाणाऱ्या एस. टी. महामंडळाच्या गाड्यांना एस टी बस नेताना जीव मुठीत धरून बस न्याव्या लागतात.

आज झालेला खारेपाटण तळगाव राजापूर गाडीचा अपघात हा याच कारणामुळे झाला असून खारेपाटण राजापूर गाडी जात असताना समोरून येणाऱ्या सावंतवाडी देवरुख या गाडीला साइड देताना बाजूला खाजगी वाहने उभी असल्याने खारेपाटण राजापूर गाडीचे पुढचे चाक रस्त्याच्या खाली गेले. वाहन चालक वाय. बी. बनसोडे व वाहक एस. के. माळी यांनी यावेळी सांगितले. अपघाताची माहिती समजताच खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस प्रमुख उद्धव साबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली.

खारेपाटण गावात आलेल्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करणे तसेच खाजगी वाहनांना बसस्थानक तसेच मुख्य रस्त्यावर वाहने उभी करू न देणे ह्या नियमांची कडक अंमलबजवणी केल्यास भविष्यात असे अपघात घडणार नाहीत. याबाबत एस. टी. प्रशासन व सार्वजनिक बांधकाम तसेच आर. टी. ओ. कार्यलयाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड-१९ च्या काळात तसेच गौरी गणपतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर खाजगी वाहन चालकांनी आपली वाहने कुठे पार्क करावी, याबाबतचे सूचना फलक खारेपाटण शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले असून ग्रामस्थांनी याचे काटेकोरपणे पालन केल्यास अपघात होणार नाही. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे’, असे खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी म्हटले आहे.

अभिप्राय द्या..