निव्रूत्ती वेतनाची रक्कम बँकेत आगाऊ स्वरूपात देण्याची मागणी..

निव्रूत्ती वेतनाची रक्कम बँकेत आगाऊ स्वरूपात देण्याची मागणी..

आचरा /-

सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या निवृत्ती वेतन धारकांना मिळणारी निवृत्ती वेतनाची रक्कम दर महिन्याला उशिराने खात्यावर जमा होत असल्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक / ग्रामविस्तार अधिकारी / विस्तार अधिकारी संघटनेने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे लक्ष वेधतानाच गणेश चतुर्थी सण १० सप्टेंबर पासून सुरू होत असून १० सप्टेंबर पूर्वी ऑगस्ट महिन्याची निवृत्ती वेतनाची रक्कम मिळणे शक्य नसल्याने ही रक्कम बँकेने आगाऊ स्वरूपात द्यावी अशी मागणी केली होती. याबाबत जिल्हा बँकेने ऑगस्ट महिन्याची निवृत्ती वेतनाची रक्कम आगाऊ स्वरूपात देण्याचा निर्णय घेऊन ती ग्रामसेवक संवर्गाच्या निवृत्ती वेतन धारकांच्या खाती अटीशर्तीसह जमा करण्याचे आदेश आपल्या सर्व शाखांना दिले आहेत.

सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या निवृत्ती वेतन व अन्य रक्कमा बँक खात्यावर वेळीच जमा करण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक / ग्रामविस्तार अधिकारी / विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश राणे यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. सुमारे ९५ टक्के सेवानिवृत्तांचे निवृत्ती वेतन अन्य रकमा या जिल्हा बँकेमार्फत त्यांच्या बँक खाती जमा होतात. मात्र, कोरोना महामारीमुळे दर महिन्याच्या सुरुवातीला मिळणारे निवृत्ती वेतन शासनाकडून महिन्याच्या अखेरपर्यंत प्राप्त होत असल्याने सेवानिवृत्तांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हा विलंब टाळण्यासाठी सदरच्या रकमा प्राप्त झाल्यावर त्याच दिवशी निवृत्ती वेतन धारकांच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हा बँकेच्या तालुका शाखांना समज देण्यात यावी, अशी मागणी प्रकाश राणे यांनी केली होती. तसेच गणेश चतुर्थी सण १० सप्टेंबर पासून साजरा होणार असून सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या निवृत्ती वेतन धारकांना १० सप्टेंबर पूर्वी निवृत्ती वेतन मिळणे शक्य नसल्याने त्यांना आर्थिक अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे निवृत्ती वेतन हे आगाऊ स्वरूपात निवृत्तीवेतन धारकांच्या खाती जमा करावे, अशी मागणीही प्रकाश राणे यांनी केली होती.

याबाबत जिल्हा बँकेच्या कार्यकारी समितीच्या सभेत ऑगस्ट महिन्याचे निवृत्ती वेतन आगाऊ स्वरूपात खाती जमा करण्याचा निर्णय घेऊन त्याला खास बाब म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. ही आगाऊ रक्कम अटी शर्तींसह निवृत्ती वेतन धारकांच्या हाती जमा करावी, असे आदेश जिल्हा बँकेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व शाखा व्यवस्थापकांना दिले आहेत यामुळे सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गातील निवृत्ती वेतन धारकांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्यत प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग या संस्थेने देखील निवृत्त प्राथमिक शिक्षकांना ऑगस्ट महिन्याचे निवृत्ती वेतन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर
आगाऊ स्वरूपात देण्याची मागणी केली होती. जिल्हा बँकेच्या या निर्णयामुळे निवृत्त प्राथमिक शिक्षकांना देखील ऑगस्ट महिन्यातील निवृत्ती वेतन आगाऊ स्वरूपात मिळणार आहे.

अभिप्राय द्या..