You are currently viewing बेळगाव महापालिका निवडणुकीत 50.41 टक्के मतदान,मराठीभाषिक एकवटले सोमवारी निकाल..

बेळगाव महापालिका निवडणुकीत 50.41 टक्के मतदान,मराठीभाषिक एकवटले सोमवारी निकाल..

बेळगाव /-

महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढय़ात मराठीभाषिक चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगाव महानगरपालिकेसाठी शुक्रवारी अत्यंत चुरशीने 50.41 टक्के मतदान झाले. तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंडय़ाखाली मराठीभाषिक पुन्हा एकदा एकवटले असून, राष्ट्रीय पक्षांनी पहिल्यांदाच पक्षाच्या चिन्हावर आपले उमेदवार उभे केले आहेत.

तर 6 सप्टेंबर रोजी म्हणजे सोमवारी मतमोजणी होणार आहे.सुमारे सव्वाचार लाख मतदारसंख्या असलेल्या बेळगाव महापालिकेत 58 सदस्य असून, निवडणुकीच्या रिंगणात 385 उमेदवार आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून 23 मराठीभाषिक उमेदवार अधिकृत घोषित केले आहेत. तर, अन्य प्रभागांत मराठीभाषिक उमेदवारांना निवडणूक लढवण्याची मुभा समितीकडून देण्यात आली आहे. तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ बरखास्त राहिलेल्या या महानगरपालिकेसाठी आता आठ वर्षांनंतर निवडणूक घेण्यात आली. यापूर्वी सन 2013 साली निवडणूक झाली होती. वॉर्डरचनेबाबत कोर्टात वाद सुरू असल्याने ही निवडणूक लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येते.

भगवे झेंडे फडकवूनच मराठीभाषिक मतदानाला.

*बेळगाव महानगरपालिका निवडणुकीतही मराठीभाषिक मतदारांनी आपला मराठी बाणा दाखवून दिला. मोरे गल्लीसह अनेक भागांत गल्लोगल्ली घरांवर भगवे ध्वज फडकावून, मराठीभाषिक मतदानाला गेले. कानडी प्रशासनाकडून आक्षेप घेत, हे ध्वज काढण्यासाठी दबावपूर्ण हालचाली करण्यात आल्या. पण त्याला न जुमानता मराठीभाषिकांनी बेळगाव, निपाणी, कारवार, भिदरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे…रहेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में… अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा