You are currently viewing राज्याची 500 कोटींची एसटीला मदत; कर्मचाऱ्यांना मिळणार जुलै महिन्याचे वेतन..

राज्याची 500 कोटींची एसटीला मदत; कर्मचाऱ्यांना मिळणार जुलै महिन्याचे वेतन..

मुंबई /-

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी (salary) राज्य शासनाने 500 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यामुळे शुक्रवारी जुलै महिन्याचे वेतन मिळणार असल्याचे ट्विट परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.

तर 7 सप्टेंबर रोजी ऑगस्ट महिन्याचे वेतन मिळण्याची शक्यता आहे.चालू आर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी 838 कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला असून उर्वरीत 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला.

उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार निधी वितरित झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे.

“राज्य शासनाने 500 कोटी रुपयांची तात्काळ मदत केली आहे. त्यामुळे शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन करता येणार आहे.”
– शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

अभिप्राय द्या..