महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ऑक्सिजन प्लांट चे ५ सप्टेंबर रोजी होणार लोकार्पण..

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ऑक्सिजन प्लांट चे ५ सप्टेंबर रोजी होणार लोकार्पण..

प्रतिमिनीट 333 लिटर होणार ऑक्सिजननिर्मिती..

कणकवली /-

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट चे राष्ट्रीय शिक्षक दिनी 5 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता लोकार्पण करण्यात येणार आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांच्या हस्ते या ऑक्सिजन प्लांट चे उद्घाटन होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या ऑक्सिजन प्लांटमध्ये 333 लिटर प्रतिमिनीट ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन तात्काळ उपलब्ध होणार आहे. एप्रिल 2021 च्या दरम्यान सिंधुदुर्गात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन ची कमतरता भासत होती. जिल्ह्यात कोरोना रोगामुळे रुग्ण दगावलेच परंतु ऑक्सिजन चा पुरवठा वेळेत न झाल्यामुळेही हार्ट अटॅक ने रुग्ण दगावले आहेत. यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती करणारा ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय एकमुखाने संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला होता . 30 मे 2021 अखेर यासाठी 46 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्गच्या शिक्षक सदस्यांच्या वतीने उभारण्यात आला आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अनुमतीनंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. ऑक्सिजन प्लांट उभारणी करण्यासाठी लागणारी आरमाडा केबल दिव-दमण येथून आणण्यात आली आहे. ऑक्सिजन प्लांट चे टेस्टिंग गुजरातमध्ये करण्यात आले आहे. टेस्टिंग क्वालिटी 90 % ते 96 % दरम्यान असावी लागते. शिक्षक समितीने उभारलेल्या ऑक्सिजन प्लांट चा टेस्ट रिपोर्ट तेवढा आहे. या प्लान्टसाठी स्वतंत्र शेड उभारण्यात आली असून,रुग्णांसाठी स्वतंत्र 33 खाटांचा कक्षही उभारण्यात आला आहे अशी माहिती कदम यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, जिल्हा सचिव सचिन मदने, राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर जेष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, जिल्हा संघटक श्रीकृष्ण कांबळी, कणकवली शाखा पदाधिकारी श्रीकृष्ण ठाणेकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..