वेंगुर्ला /-


श्री गणेश चतुर्थी सण कालावधीत वेंगुर्ले शहरासह बाजारपेठेतील नियोजना संदर्भात आयोजित केलेल्या बैठकित गणेश चतुर्थी हा सण या भागात मोठय़ा उत्साहाने व भक्तीभावाने दरवर्षी प्रत्येक घरोघरी साजरा करत असल्याने माटवी सामान विक्रेत्यांना सारस्वत बँक ते गाडीअड्डा तिठा या भागार्पयत रस्त्याच्या दुतर्फा माल विक्रीसाठी बसण्यास मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.येथील नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात गणेश चतुर्थी नियोजनाची आयोजित बैठक वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, नायब निवासी तहसिलदार नागेश शिंदे, नगरसेवक प्रशांत आपटे,नगरसेविका साक्षी पेडणेकर, शितल आंगचेकर, कृतिका कुबल, विधाता सावंत, कृपा गिरप, प्रकाश डिचोलकर, सुहास गवंडळकर, वेंगुर्ले आगाराचे प्रतिनिधी एस.बी. मुरमुरे, पोलीस निरीक्षक यांचे प्रतिनीधी पोलीस पी. जी. सावंत, ट्रफिक पोलीस मनोज परूळेकर, विद्युत वितरण कंपनीचे प्रतिनिधी, रिक्षा टेम्पो युनियनचे दत्तात्रय उर्फ शेखर शेणई, रिक्षा टेम्पो संघटनेचे जी. आर. बागवे, व्यापारी सदानंद पांजरी, अतुल नेरूरकर, संतोष गिरकर, जयंत हळदणकर, रिक्षा संघटनेचे लवू तेरसे, फळ व्यापारी प्रितम जाधव, साईनाथ खवणेकर या सहित व्यापाऱ्यांचा समावेश होता.
यासभेत गणेश चतुर्थी कालावधीत ८ ते २१ सप्टेंबर या कालावधीत वेंगुर्ले आगाराच्या मठ मार्गे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व बसगाडय़ा रामेश्वर मंदिरमार्गे प्रवास करतील व रामेश्वर मंदिर येथे या कालावधीत गाडय़ांचा थांबा राहिल. तसेच गणेश चतुर्थी कालावधीत रिक्षा व टू व्हीलर या सारस्वत बँक ते मारूती स्टॉप या भागात येण्यास मनाई असेल. मारूती स्टॉप ते राममारूती रोडने या गाडय़ा प्रवास करून शकतील. नेवाळकर गल्ली येथील रिक्षा स्टँण्ड वरील रिक्षांना परूळेकर गल्ली या भागात लावण्यास मुभा देण्यांत आली आहे. तसेच बाजारपेठेत दुकाने असलेल्या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांत जो माल चतुर्थी सणासाठी भरावयाचा आहे. तो रात्रौ ९ ते सकाळी ५ या वेळेत भरून घ्यावा.गणेश चतुर्थी कालावधीत मोकाट जनावरांवर प्रतिदिन ५०० रूपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय या सभेत घेण्यांत जाहीर करण्यात आला आहे. तसेच ज्या व्यापाऱ्यांना वा व्यक्तींना आपली जाहिरात बॅनर वा प्लँक्स माध्यमातून करावयाची आहे, त्यांनी नगरपरिषदेची परवानगी घेऊन करावयाची आहे. नगरपरीषदेच्या चार ठिकाणी लावण्यांत आलेल्या एल. ई. डी. स्क्रिनवर जाहिरात करावयाची असेल त्यांनी त्याचा कर भरणा केल्यास ती केली जाणार आहे. असे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी स्पष्ट केले.
त्याच प्रमाणे फटाके विक्रेत्या व्यापाऱ्यांनी वेंगुर्ले तहसिलदार कार्यालयात फटाके विक्रीच्या परवान्याची तपासणी करून घ्यावी. कारण विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे तहसिल प्रशासनाने स्पष्ट केले आहे.विद्युत वितरण कंपनीने गणेश चतुर्थी कालावधीत लोड शेडींग करू नये. अशा सुचना करण्यांत आल्या.
गणेश चतुर्थी कालावधीत जे निर्माल्य वापरले गेले असेल ते गणेश विसर्जन स्थळी ठेवण्यांत आलेल्या निर्माल्य कलशामध्येच टाकून नागरिक व गणेश भक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेश चतुर्थीपूर्वी शहरातील रस्त्यावर काही ठिकाणी पडलेले खड्डे गणेशाच्या आगमनापूर्वी भरून रस्ते वाहातुकीस सुयोग्य करण्यात येथील असे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले.वेगुर्ले शहरात श्री गणेश चतुर्थी सण हा शांतता व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी वेंगुर्ले शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप व प्रशासनातर्फे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page