उपनगराध्यक्षांचा राजीनामा म्हणजे राजकीय स्टंटबाजी.;नगराध्यक्ष दिलीप गिरप..

उपनगराध्यक्षांचा राजीनामा म्हणजे राजकीय स्टंटबाजी.;नगराध्यक्ष दिलीप गिरप..

वेंगुर्ला /-


आज २६ ऑगस्ट रोजी नगरपरिषद उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ही तर केवळ आगामी नगरपरिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेली ही ‘राजकीय स्टंटबाजी’ आहे. या राजीनाम्यात दिलेले कारणही चुकीचे असल्याचे मत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केले आहे. येथील सागररत्न मत्स्य बाजारपेठेच्या तळ मजल्यावरील १५ गाळ्यांबाबत जुन्या गाळेधारकांवर सत्ता धाऱ्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप करत आज उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावर नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेची राज्यात सत्ता असताना आमदार दीपक केसरकर व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत दिनांक ६ ऑगस्ट रोजी मंत्रालयात या संदर्भात बैठक घेऊन या बैठकीत ठरल्याप्रमाणे व शासनाच्या आदेशाचे पालन करून ही नवीन लिलाव प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तरी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांनी राजीनामा देताना दिलेले कारण हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन तसेच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेली राजकीय स्टंटबाजी आहे. राऊळ यांनी ज्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजप यांची युती तुटली, त्याच वेळी राजीनामा देणे अपेक्षित होते. परंतु सत्तेचा संपूर्ण उपभोग घेतल्यानंतर कार्यकाल पूर्ण होण्यासाठी अवघे २ महिने असताना व्यापाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे हे काम केले आहे. त्यांना जर व्यापाऱ्यांची खरोखरच काळजी असती तर नगरविकास मंत्र्यांकडून व्यापाऱ्यांना अपेक्षित असलेले आदेश त्या आणू शकल्या असत्या.परंतु हे करु न शकल्याने आपल्याच नाकर्तेपणावर पडदा टाकण्यासाठी त्यांनी राजीनामा नाट्य केले आहे. मात्र वेंगुर्लेची जनता सुज्ञ असून अशा प्रकारच्या राजकीय स्टंटबाजी ला थारा देणार नाही याची मला खात्री आहे, त्यामुळे उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांचा राजीनामा मी मंजूर करून पुढील कारवाईसाठी पाठवत असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले आहे. यावेळी गटनेते सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रशांत आपटे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..