मालवण /-

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून शिवसेना भाजपाचे वाद विकोपाला गेले असताना आज रात्री उशिरा अज्ञात दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून खासदार विनायक राऊत यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. तळगाव-मालवण येथील बंगल्यावर अज्ञात व्यक्तींनी सोड्याच्या बाटल्या तसेच दगड फेक केली. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली असून चार ते पाच व्यक्ती दुचाकीने आल्या होत्या, असे राऊत यांच्या निकटवर्तीयानी सांगितले. सर्व जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असून याबाबत पोलीसांना माहिती दिल्याचे सांगितले. राऊत सध्या दिल्ली येथे असून त्यांनी राणेंच्या वक्तव्याबाबत जोरदार टिका करत पंतप्रधानांना पत्र लिहून राणेंचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केली होती. राऊत यांचे निकटवर्तीय नागेंद्र परब यांनी या घटनेला दुजोरा देत पोलीसांकडून या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले. तसेच हे चार ते पाच दुचाकी स्वार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले. या घटनेची माहिती दिल्ली येथे खासदार विनायक राऊत यांना देण्यात आली आहे. असे परब म्हणाले. केंद्रिीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटत असल्याचे दिसून येत असून पोलीसांकडून सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page