मालवण /-
मालवण शहरात व्यापारी संघाने जनता कर्फ्यूला विरोध केला असताना काही व्यापाऱ्यांनी नगराध्यक्षांची भेट घेऊन पालिका घेईल त्या निर्णयाला समर्थन दिले आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी उद्या (शुक्रवारी) सकाळी ११.३० वाजता पालिकेची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे पालिकेच्या उद्याच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मालवण शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे त्यामुळे इतर तालुक्यांप्रमाणे शहरातही जनता कर्फ्यू जारी करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी गुरुवारी सायंकाळी व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेला निमंत्रित केले होते. या बैठकीत जिल्हा व्यापारी महासंघाने जाहीर केलेल्या भूमीकेवर मालवण व्यापारी संघही ठाम असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. यामुळे मालवणात जनता कर्फ्यू घेण्यास व्यापारी संघाचा विरोध कायम असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सकाळी मालवण शहरातील काही व्यापारी वर्गाने नगराध्यक्षांची भेट घेवून जनता कफ्युबाबत पालिका प्रशासन जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल असे जाहीर केले आहे, अशी माहिती यावेळी नगराध्यक्षांनी सभागृहात दिली. तरीही मालवण व्यापारी संघ आपल्या विरोधावर ठाम राहिला. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात जनता कफ्यु घ्यावा, त्यात व्यापारी महासंघाचा सहभाग असेल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. पालिका सभागृहात सायंकाळी ५ वाजता ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्ष राजन बराडकर, बांधकाम सभापती यतीन खोत, नगरसेवक दिपक पाटकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेट्ये, नितीन वाळके, बाळू अंधारी, रवि तळाशिलकर, विजय केनवडेकर, बाबल कवटकर, नंदू गवंडी, भाऊ सापळे आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी जनता कफ्युबाबत अनेकजण आपल्याला भेटून शहरात जनता कफ्यु लागू करण्यात यावा, अशी मागणी करत आहेत. यामुळे व्यापारी, राजकीय मंडळी, मच्छी विक्रेते, नगरसेवक यांची मते विचारात घेवून आपण निर्णय घेणार असल्याने आजची सभा आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. यावर व्यापारी संघातर्फे जनता कफ्यु सगळ्या गोष्टींवर अंतीम उपचार नसल्याने परिस्थिती निर्माण झाल्यास सदरचा निर्णय योग्य आहे, मात्र सद्यस्थितीत अशाप्रकारची परिस्थिती नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही काळजी घेवून व्यापार करत आहेत, शासकीय नियमांचे पालन करू असे सांगितले. यामुळे तुर्ततरी जनता कफ्यु घेण्याबाबत आमचा विरोध राहिल असे स्पष्ट केले. दरम्यान, जनता कफ्युबाबत काही व्यापारी वर्गाचा पाठिंबा आणि तर काहींचा विरोध आहे. त्यामुळे शुक्रवारी मालवण नगरपालिकेच्या नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आलेली असून या बैठकीतून शहरातील जनता कफ्युबाबत निर्णय जाहीर करण्यात येईल, असे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत कोणता निर्णय होणार, याबाबत उत्सुकता आहे.