You are currently viewing लाड-पागे प्रकरणावरून जि प.च्या स्थायी समितीत गदारोळ…!

लाड-पागे प्रकरणावरून जि प.च्या स्थायी समितीत गदारोळ…!

सत्तारूढ भाजपा सदस्यांनी मांडला ग्रामविकास मंत्र्यांच्या विरोधात निषेधाचा ठराव..!असा ठराव घेता येणार नाही: पराडकर..

सिंधुदुर्गनगरी /-

लाड-पागे समिती प्रकरणावरून आज जि.प.च्या स्थायी समिती सभेत बराच गदारोळ झाला.सत्तारूढ भाजपा सदस्य व विरोधी शिवसेना सदस्य  यांच्या शाब्दीक चकमकी झडल्या.’सीईओं ‘ च्या आदेशाला ग्रामविकासमंत्री स्थगिती कशी देतात अशी विचारणा करत सत्तारूढ सदस्यांनी त्यांच्या निषेधाचा ठरावही मांडला अखेर या विषयावरील वादळी चर्चेनंतर असा ठराव घेता येणार नाही असे समिती सचिव  व उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी स्पष्ट करताच या विषयावर पडदा पडला आणि सभागृह शांत झाले.
                 
लाड-पागे समितीच्या शिफारशी अंतर्गत झालेल्या नियुक्त्या ,नियुक्ती देण्यात आलेल्या सहा जणांचे निलंबन त्यापैकी एकाला पुन्हा सेवेत घेणे, जि. प.च्या पाच प्रशासन अधिकाऱ्यांचे निलंबन, ग्रामविकास मंत्र्यांचे स्थगितीचे आदेश, ‘सीईओ ‘नी हे आदेश धुडकावणे आदी प्रश्न उपस्थित करीत शिवसेना सदस्य संजय पडते,अमरसेन सावंत,मायकल डिसोझा यांनी आजच्या स्थायी समिती सभेत आक्रमक भूमिका घेत जि. प.प्रशासनाच्या कारभारावर हल्ला बोल केला.सत्तारूढ सदस्यांनीही मग प्रशासनाची बाजू घेत त्याला प्रत्युत्तर दिले.यावरून सभागृहात एकच वादळ उठले.दोन्ही बाजूच्या सदस्यांमध्ये शाब्दीक चकमक उडाली.विरोधी पक्ष सदस्य जि.प.च्या कारभारावर नाहक टीका करीत,आरोप करीत जि. प.ची बदनामी करीत आहेत असा आरोप त्यांनी केला.अखेर बऱ्याच शाब्दिक चकमकीनंतर उपाध्यक्ष राजू म्हापसेकर यांनी ग्रामविकास मंत्र्यांच्या निषेधाचा ठराव मांडला.या ठरावाला सेना सदस्य संजय पडते व अन्य सदस्यांनी तीव्र विरोध केला.अखेर बऱ्याच गदारोळानंतर असा ठराव घेता येणार नाही असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी स्पष्ट केल्यानंतर हा विषय संपला आणि सभागृहाचे वातावरण शांत झाले.
       
शिक्षण विभागाच्या ‘वॉटर प्युरिफायर’  खरेदीचा विषयही आज  सभागृहात गाजला. याप्रकरणी पदाधिकाऱ्यांचा काहीही दोष नसताना विरोधक विनाकारण सत्तारूढ सदस्यांना ‘ टारगेट ‘ करत आहेत, सेनेचे गटनेते नागेंद्र परब विनाकारण जिल्हा परिषदेची बदनामी करत असून त्यांनी आपले आरोप मागे घ्यावेत अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी करून याप्रकरणी सखोल चौकशी होऊन  जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी वसुलीचीही कारवाई  करावी अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले
               
यावर ‘ पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून कामे कशी होणार ‘ असा सवाल विरोधी सदस्यांनी सभागृहात करताच दोन्ही बाजूच्या  सदस्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.

अभिप्राय द्या..