जलजीवन मिशन योजने अंतर्गत १ टक्काही काम नाही.;जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीत बाब उघड..

जलजीवन मिशन योजने अंतर्गत १ टक्काही काम नाही.;जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीत बाब उघड..

सिंधुदुर्गनगरी /-
जल जीवन मिशन योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये १ लाख २१ हजार २५६ कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मात्र २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षातील गेल्या चार महिन्यात अद्याप १ टक्काही काम झाले नसल्याचे आजच्या जलव्यवस्थापन समिती सभेत उघड झाले.

जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती अंकुश जाधव, महेंद्र चव्हाण, शर्वांनी गावकर, समिती सरोज परब, पल्लवी राऊळ, आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आजच्या जलव्यवस्थापन समिती सभेत ,जल जीवन मिशन अंतर्गत कामाचा आढावा घेतला असता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २०२०-२१ साठी १ लाख ८९ हजार २७० कुटुंबांना नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी मार्च २०२१ अखेर १ लाख २१ हजार २५६ कुटुंबाना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. तसेच सन २०२१-२२ साठी मिळालेल्या ६८ हजार ०१४ नळजोडणीच्या उद्दिष्टा पैकी गेल्या चार महिन्यात ६४३ कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा करून आतापर्यंत ०.९५ टक्के एवढे काम पूर्ण झाले असल्याची बाब आजच्या सभेत उघड झाली आहे. यावेळी पाऊसामुळे कामाची गती मंदावलेली दिसत असली तरी पाऊस कमी होताच जलजीवन मिशनच्या कामाला गती येईल . जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ८ कोटी २० लक्ष खर्चाची ८५ कामे व जिल्हास्तरावर १२ कोटी ९० लाख खर्चाची ५७ कामे नव्याने मंजूर करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी दिली.

बांदा ते दोडामार्ग या रस्त्याची दुर्दशा झाल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. याबाबत गेले वर्षभर सभेत विषय मांडूनही या रस्त्याची डागडुजी झालेले नाही.अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत. याबाबत उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले व तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच येत्या आठ दिवसात या रस्त्याचे खडीकरण व त्यावर रोलिंग करून वाहतुकीस रस्ता सुरळीत करावा अन्यथा ग्रामस्थांना घेऊन तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

अभिप्राय द्या..