नवीन तुकडेबंदी परिपत्रकामुळे दस्त नोंदणी प्रक्रियेतील अडचणी दूर करा.;आ.नाईक यांची महसूलमंत्री यांच्याकडे मागणी..

नवीन तुकडेबंदी परिपत्रकामुळे दस्त नोंदणी प्रक्रियेतील अडचणी दूर करा.;आ.नाईक यांची महसूलमंत्री यांच्याकडे मागणी..

सिंधुदुर्ग /-

राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी १२ जुलै २०२१ रोजी तुकडेबंदी तुकडे जोड (सुधारणा अधिनियम २०१५) ने मूळ अधिनियमात समाविष्ट केलेल्या कलम ८ ब ला अनुसरून परिपत्रक राज्यातील सर्व दुय्यम निबंधकांना जारी केले आहे. सद्यस्थितीत या परिपत्रकाचा दूरगामी परिणाम दस्त नोंदणीवर होत आहे. यामुळे अनेक दस्तांच्या नोंदण्या अडचणीत आल्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच सदरच्या परिपत्रकामुळे दस्त नोंदणी प्रक्रियेमध्ये निर्माण झालेल्या कायदेविषयक तांत्रिक अडचणी दूर करून सुधारित परिपत्रक काढण्याकरीता संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठकीचे आयोजन करण्याच्या मागणीचे निवेदन ना.बाळासाहेब थोरात यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे कि, परिपत्रकामधील तरतुदींमधील मुद्दा क्रमांक १ यामध्ये एखाद्या सर्वे नंबर चे क्षेत्र २ एकर असल्यास त्यापैकी एक,दोन,तीन, गुंठे जागा विकत घेण्याकरिता सदर क्षेत्राचे दस्त नोंदणी होणार नसून, याकरिता सदर क्षेत्राचे ले आउट करणे आवश्यक असल्याचे नवीन परीपत्रकामध्ये नमूद आहे. यामुळे ज्या खातेदारांचे मिळकत क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा म्हणजेच दोन एकर पेक्षा कमी असेल असे खातेदार आपले संपूर्ण क्षेत्र (पैकी अथवा तुकडा न करता) विक्री करत असेल तर अशा खातेदारांना या परिपत्रकानुसार दस्त नोंदणी करणेस अडचणी निर्माण होत आहेत.

‘७/१२ च्या इतर हक्कांमध्ये तुकडा अशी नोंद नमूद असल्याने व खातेदार संपूर्ण क्षेत्राचे खरेदीखत करून देत असेल तरी दुय्यम निबंधक कार्यालयाकडून सदर परिपत्रकाद्वारे दस्त नोंदणी नाकारण्यात येत आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मिळकतीचे क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्राच्या मर्यादेपेक्षा कमी असल्याने व किमान ९५ टक्के ७/१२’ च्या इतर हक्कामध्ये तुकडा अशी नोंद नमूद असल्याने मिळकतीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी मुद्रांक शुल्काद्वारे शासनास मिळणारे उत्पन्न देखील थांबले जात आहे.
त्यामुळे सदरच्या परिपत्रकामुळे दस्त नोंदणी प्रक्रियेमध्ये निर्माण झालेल्या कायदेविषयक तांत्रिक अडचणी दूर करून सुधारित परिपत्रक काढण्याकरीता संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे.

अभिप्राय द्या..