You are currently viewing भात लावणी करताना शेतात आली मगर..

भात लावणी करताना शेतात आली मगर..

बांदा /-

मडुरा – रेखवाडी येथे भातशेतीच्या बांधावरच सुमारे सात फुट मगर आल्याने शेतकर्‍यांमध्ये एकच घबराट पसरली. भात लावणीसाठी तरवा घेऊन जात असलेल्या एका वृद्धेच्या निदर्शनास ही मगर पडली. तीने स्थानिक ग्रामस्थांना याबाबत माहिती देताच युवक दीपक राऊळ, संदिप राऊळ, संतोष कोरगावकर, संजय कोरगावकर, अमित राऊळ व बाबू पंडीत यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मगर खूपच आक्रमक झाली होती. मगरीला पकडणे खूपच जिकरीचे होते. अखेर युवकांनी जीव धोक्यात घालत मगरीला पकडून दोरीच्या सहाय्याने बांधून ठेवले. याबाबतची माहिती वनविभागाला देऊन सायंकाळी उशिरा सदर मगर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. मडूरे परिसरात मगरींच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. नदीच्या पुराच्या पाण्याबरोबर मगरी भातशेती क्षेत्रात येत असल्याने शेतकर्‍यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. पाणथळ क्षेत्रातील शेती करणेही धोकादायक बनले आहे. वनविभाग पंचनामे करण्यापलीकडे कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे.

अभिप्राय द्या..