जांभवडेतील पवार बंधूंची<br>शासनाच्या मदतीची वाट नपाहता जामदा नदीवर बांधला साकव..

जांभवडेतील पवार बंधूंची
शासनाच्या मदतीची वाट नपाहता जामदा नदीवर बांधला साकव..

वैभववाडी /-

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आजही काही वाडी-वस्त्यांवर मूलभूत पायाभूत सुविधाच पोहोचल्या नाहीत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणा-या जांभवडे आणि कोळंब या गावांमधून वाहणाऱ्या जामदा नदीवर जांभवडे येथील पवार बंधूनी ६० फूट लांबीचा लाकडी साकव घातला आहे. त्यांनी आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून साकव पूर्णत्वास नेला आहे. प्रत्येक काम शासनाने करावे या मानसिकतेला बगल देऊन पवार बंधूनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामस्थांसह परिसरातून समाधान व्यक्त होत असून यामुळे ३ कि. मी. ची पायपीट थांबणार आहे. स्वातंत्र्यानंतरही अशी अनेक गावे आहेत की, त्याठिकाणी कोणत्याच सुविधा पोहोचलेल्या नाहीत. वैभववाडी तालुक्यातील जांभवडे पालांडेवाडी. या वाडीची लोकसंख्या जवळपास ६०० इतकी आहे. या वाडीतील शेतकऱ्यांच्या जमिनी या नदीच्या पलिकडे आहेत. येथील काही कि. मी. अंतरावर असणाऱ्या बौध्दवाडीवर कॉजवे बांधण्यात आला आहे. परंतु या पालांडेवाडीला या कॉजवेवरुन जाण्यासाठी दोन ते तीन कि. मी. पायपीट करावी लागते. शेतीच्या कामात त्रास होवू नये म्हणून याच वाडीतील श्रीधर पवार, जयराम पवार, मोतीराम पवार व आत्माराम पवार या चार बंधूनी धाडसी निर्णय घेत या नदीवर लाकडी साकव बांधण्याचा निर्णय घेतला. नदीचे पात्र खूपच मोठे असल्याने त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला. मार्चपासून त्यांनी साकव बांधणी कामाला सुरुवात केली. दिवसभरात काम करत फावल्या वेळेत थोडे-थोडे याठिकाणी काम करण्यास सुरूवात केली. अखेर त्यांनी जूनमध्येच साकव पूर्णत्वास नेला. पावसाळ्यात ही नदी दुथडी भरुन वाहत असते. त्यामुळे कोळंब आणि जांभवडे या दोन गावांचा संपर्क तुटतो. कोळंबला किंवा जांभवडे या ठिकाणी येणाऱ्या मंडळींना दोन ते तीन कि. मी. वळसा घालून बौध्दवाडीवर असणाऱ्या कॉजवेवरुन ये-जा करावी लागते. शेतीच्या कामात त्रास होवू नये. तसेच येथील ग्रामस्थांना याचा फायदा व्हावा म्हणून पवार बंधूनी धाडसी निर्णय घेत अवघ्या तीन महिन्यात या चौघा बंधूंनी साकव पूर्णत्वास नेला. याठिकाणी २०१७ पासून सलग तीन वर्षे साकव घालण्यात आला होता. परंतु अतिवृष्टीमध्ये साकव वाहून गेला. या वाडीवरती लोखंडी साकव बांधण्यात यावा. अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे. कायमस्वरुपी पूल होण्यासाठी पालकमंत्र्यांकडे मागणी ग्रामविकास मंडळ पालांडेवाडी-जांभवडे या मंडळाने याठिकाणी कायमस्वरुपी लोखंडी साकव व्हावा यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

अभिप्राय द्या..