शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे १०८ सेवा लवकर उपलब्ध करून मिळावी मनोज उगवेकर

शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे १०८ सेवा लवकर उपलब्ध करून मिळावी मनोज उगवेकर

वेंगुर्ला/-

कोरोना पार्श्वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे १०८ सेवा लवकरात लवकर उपलब्ध करून मिळावी,अशी
शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. तसेच गावा गावात रुग्ण मिळत असल्याने रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा जिल्हा रुग्णालया सारख्या ठिकाणी योग्य उपचारासाठी नेण्यासाठी १०८ सेवेतील रुग्णवाहिका तात्काळ मिळणे आवश्यक असते. परंतु जिल्ह्यात सदर सेवा मर्यादित स्वरूपात उपलब्ध असल्याने तसेच काही रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने त्या वेळेत न पोचता कोरोना किंवा तात्काळ उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागतो, परिणामी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो.
शिरोडा गावाची लोकसंख्या सुमारे ७५०० एवढी असून वेंगुर्ला तालुका व सावंतवाडी तालुक्यातील जवळपास १० ते १२ गावातील नागरिक शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्याच्या तक्रारी संदर्भात उपचारासाठी येत असतात. त्यामुळे १०८ सेवा शिरोडा येथे सुरू केल्यास याचा लाभ शिरोडा नजीकच्या रेडी , आरवली ,सागरतीर्थ , आसोली,अणसुर , मोचेमाड ,आजगाव , धाकोरे , तिरोडा , नाणोस , गुळदुवे , आरोंदा , मळेवाड ते सातार्डे व इतर गावांना मिळू शकतो. त्यामुळे शिरोडा उपजिल्हा रुग्णालया साठी शासनाची १०८ सेवा लवकरात लवकर उपलब्ध व्हावी अशी शिरोडा पंचक्रोशीतील लोकांची मागणी असल्याने शिरोडा ग्रामपंचायत सरपंच मनोज उगवेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाने सदर मागणीचा गांभीर्याने विचार करून कोरोना पार्श्वभूमीवर शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे १०८ सेवा लवकरात लवकर उपलब्ध करून मिळावी असे निवेदन पालकमंत्री, आमदार नितेश राणे,जिल्हाधिकारी , जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग यांना आज मंगळवार १५ सप्टेंबर २०२० रोजी दिले आहे.

अभिप्राय द्या..