कणकवली /-

कणकवली शहरातील परबवाडीतील ज्या भागात कोविड डेल्टा प्लसचा रूग्ण सापडला, त्या भागातील सहा इमारती सील करण्यात आल्या आहेत. या इमारतीमधील प्रत्येक नागरिकाची स्टॅब घेण्यात आले आहेत. तसेच प्रत्येकाची ऑक्सिजन पातळी आणि तापमान देखील तपासले जात असल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज दिली. दरम्यान कोविड डेल्टा प्लस रूग्णांकडून कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने आरोग्य यंत्रणा तसेच नगरपंचायत विभाग सतर्क झाला आहे. परबवाडी येथील कामतसृष्टीचा परिसर आज महसूल, पोलिस आणि नगरपंचायत प्रशासनाने चौदा दिवसांसाठी सील केला. तसेच या परिसरात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. कोविड डेल्टा रूग्ण सापडलेल्या परबवाडीतील कामतसृष्टी भागाला आज उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी नगराध्यक्ष नलावडे यांनी नगरपंचायत माध्यमातून सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या असल्याची माहिती दिली. कणकवली शहरात रेल्वे स्टेशन जवळ डेल्टा प्लसचा सापडलेला रुग्ण हा उपचार आंती बरा झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. डेल्टा प्लस चा रुग्ण महिन्याभरापूर्वी पॉझिटिव्ह आढळला होता. मात्र तो रुग्ण ज्या कॉम्प्लेक्समध्ये राहत आहे त्या कॉम्प्लेक्स मध्ये कोविडच्या संसर्गाचा प्रसार झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कणकवली नगरपंचायत व आरोग्य विभाग यांच्याकडून सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page