महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘मन:शांती’ या विषयावरील संशोधन पोर्तुगाल येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘मन:शांती’ या विषयावरील संशोधन पोर्तुगाल येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

सिंधुदुर्ग /-

नामजप आणि स्वभावदोष निर्मूलन यांमुळे आनंदप्राप्ती होते !

सिंधुदुर्ग- प्रत्येक व्यक्ती आनंद आणि मन:शांती यांच्या शोधात असते; परंतु जीवनातील विविध समस्यांचा सामना करतांना ती आनंद आणि मन:शांती हरवून बसते. उतारवयात शारीरिक दुखण्यांच्या जोडीला व्यक्तीला विविध प्रकारच्या भयांनाही सामोरे जावे लागते. नामजप आणि स्वभावदोष-अहं निर्मूलन यांचा अंगिकार केल्यास सर्वोच्च अन् कायमस्वरूपी टिकणारे सुख, म्हणजेच आनंद, तसेच मन:शांती यांची प्राप्ती होऊ शकते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. मिलूटिन पॅनक्रॅट्स यांनी केले. ते 28 मे या दिवशी लिस्बन, पोर्तुगल येथे ‘7 व्या युरोपियन कॉन्फरेन्स ऑन रिलिजन, स्पिरिच्युलीटी अ‍ॅन्ड हेल्थ एजिंग, स्पिरिच्युलीटी अ‍ॅन्ड हेल्थ’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते. या परिषदेचे आयोजन ‘युरोपियन इनिशिएटीव्ह ऑन रिलिजन, स्पिरिच्युलीटी अ‍ॅन्ड हेल्थ अ‍ॅन्ड दी कॅथॉलिक युनिव्हर्सिटी ऑफ पोर्तुगाल’ यांनी केले होते. श्री. मिलूटिन पॅनक्रॅट्स यांनी या परिषदेत ‘उतारवयातील व्यक्तींना मन:शांती मिळवण्यासाठी साहाय्य’ हा शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक असून, श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाद्वारे वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर करण्यात आलेला हा 71 वा शोधनिबंध होता. याआधी 15 राष्ट्रीय आणि 54 आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये विविध शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत. यापैकी 4 आंतरराष्ट्रीय परिषदांतील शोधनिबंधांना सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार प्राप्त झाला आहे. *श्री. मिलूटिन पॅनक्रॅट्स पुढे म्हणाले की*, जीवनातील समस्यांमुळे आपण दुःखी होतो. परिणामस्वरूप स्वतःची मनःशांती आणि सुख यांवर अनिष्ट परिणाम होतो. आपल्या जीवनातील समस्यांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशी 3 मूलभूत कारणे असतात. जीवनातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक समस्या आध्यात्मिक कारणांमुळे असतात; परंतु त्या शारीरिक किंवा मानसिक समस्यांच्या स्वरूपात प्रकट होऊ शकतात. ही आकडेवारी आध्यात्मिक संशोधनातून प्राप्त झाली आहे. प्रारब्ध, पूर्वजांचे अतृप्त लिंगदेह आणि सूक्ष्मातील वाईट शक्ती, ही 3 प्रमुख आध्यात्मिक कारणे होत. समस्येच्या निवारणासाठी समस्येच्या कारणाच्या स्तरानुसार उपाय करावा लागतो. जेव्हा एखाद्या समस्येचे मूलभूत कारण आध्यात्मिक असते, तेव्हा उपाययोजनाही आध्यात्मिकच करणे आवश्यक असते. आध्यात्मिक उपायांनी शारीरिक आणि मानसिक समस्यांमध्येही साहाय्य होते, विशेषतः जेव्हा या समस्यांचे मूलभूत कारण आध्यात्मिक असते. *श्री. मिलूटिन पॅनक्रॅट्स यांनी आनंदप्राप्ती आणि मन:शांती करण्यासाठी तीन प्रमुख प्रयत्न या वेळी सांगितले.*

1. नामजप : प्रत्येक व्यक्ती आपापल्या धर्मानुसार नामजप करू शकते. आजच्या काळासाठी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा एक अत्यंत उपयुक्त नामजप आहे.

2. संरक्षक नामजप : ‘श्री गुरुदेव दत्त’ हा जप पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण करतो. उतारवयातील व्यक्तींना प्रत्यक्ष जप करणे जमले नाही, तर निदान त्यांच्या जवळ ऑडिओ लावून ठेवू शकतो.

3. स्वभावदोष निर्मलन प्रक्रिया : याद्वारे मनातील स्वभावदोषांचे संस्कार नष्ट होऊ शकतात.याप्रमाणे व्यक्तीने प्रामाणिकपणे साधनेचे प्रयत्न केल्यास तिला पुष्कळ लाभ होऊन प्रतिकूल परिस्थितीतही मन:शांती लाभू शकते. उतारवयात मन:शांती लाभावी यासाठी जीवनात लवकरात लवकर साधना सुरू करावी, असेही श्री. मिलूटिन पॅनक्रॅट्स यांनी या वेळी सांगितले.

अभिप्राय द्या..