दोडामार्ग /-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रअंतर्गत जलशक्ती अभियान व जिल्हा परीषद आदर्श गाव योजनेचा शुभारंभ आज कोनाळ ग्रामपंचायत हद्दीत सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण समिती सभापती डॉ.अनिषा दळवी व दोडामार्ग पंचायत समिती सदस्य श्री.लक्ष्मण नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी कोरोना निर्बंधामुळे सद्यस्थितीत दळणवळण तसेच इतर बाबी बंद असल्यामुळे कामगारांच्या हाताला काम नाही व त्यामुळे त्यांची आर्थिक कुचंबणा होण्याची शक्यता गृहीत धरुन केंद्र शासनाने मनरेगा अंतर्गत कामे सुरु ग्रामीण भागातील मजुरांना काम देण्याचा प्रयत्न केला आहे.त्याकरिता जलशक्ती अभियानामध्ये मान्सुनपूर्वी जून २०२१ अखेर घरोघरी शोषखड्डे बांधकाम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी,अभियानाचे क्षेत्रिय अधिकारी श्री.सुजित गायकवाड व कोनाळ सरपंच श्री.पराशर सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष प्रविण गवस,उपसरपंच प्रितम पोकळे,सदस्य महेश लोंढे,लाभार्थी सूर्याजी लोंढे,ग्रामसेवक श्री.मस्के,आशा स्वयंसेविका शिवानी शेटवे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.