You are currently viewing वादळ काळातील जनतेने दाखवलेला संयम, जनतेची एकजुट व सहकार्यामुळेच मालवण शहर पूर्वपदावर..

वादळ काळातील जनतेने दाखवलेला संयम, जनतेची एकजुट व सहकार्यामुळेच मालवण शहर पूर्वपदावर..

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मानले मालवण वासीयांचे आभार…

मालवण /-
तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहर पूर्वपदावर येण्यासाठी नागरिकांची एकजूट व सहकार्य महत्वाचे ठरले. याबद्दल नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मालवणवासीयांचे आभार मानले आहेत.
शहराला १६ मे रोजी तोक्ते वादळाचा जोरदार तडाखा बसला. संपूर्ण शहरात मोठे नुकसान झाले. असा कुठलाच भाग नव्हता की त्या ठिकाणी वादळाने विध्वंस केला नाही. हवामान खात्याने वादळाची जी तीव्रता सांगितली होती त्यापेक्षा जास्त तीव्रतेने हे वादळ शहरात धडकले. मोठ्या प्रमाणात झालेल्या पडझडीतून शहर पूर्वस्थितीत यायला बरेच दिवस लागतील असा अंदाज सर्व स्तरातून व्यक्त होत होता. परंतु या आपत्ती काळात शहराच्या प्रत्येक नागरिकांनी ज्या पद्धतीने प्रशासनच्या हातात हात घालून मदत केली, सात आठ दिवस पाणी, विज नसताना जो संयम दाखवला त्यामुळेच बहुतांश मालवण शहर एका आठवडाभरात पूर्वपदावर आले.
या वादळाचा जास्त फटका महावितरण कंपनीला बसला. वीज खांब कोसळले, तारा तुटून गेल्या. दुरुस्तीसाठी जवळपास २०० च्या वर महावितरणचे कर्मचारी कोल्हापुर, सांगली, बारामती, परभणी, पुणे या ठिकाणावरुन मदतीसाठी शहरात दाखल झाले. स्थानिक कर्मचारी, दाखल झालेले कर्मचारी व नागरिक यांच्या प्रयत्नातून विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत झाला. या कर्मचाऱ्यांनी मालवणच्या जनतेचे, लोकप्रतिनिधी यांचे मिळालेल्या सहकार्याबद्दल तोंड भरुन कौतुक केले.
कोविडच्या कामात मालवण पालिकेची प्रशासकीय यंत्रणा व्यस्त असताना वादळाचे संकट धडकले. मालवण पालिकेची यंत्रणा चक्रीवादळ आपत्ती काळात अपुरी पडली. मात्र उपलब्ध सर्व यंत्रणानी सर्वतोपरी काम केले. नागरिकांचे सहकार्य प्रत्येक ठिकाणी मिळत होते. पालिकेतील बरेचसे सफाई कर्मचारी यांच्याही घराचे, झाडांचे वादळात नुकसान झाल्याने काही कर्मचारी कामावर येवू शकले नाहीत. काही सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यामुळे दैनंदिन सफाई बाबतीत नागरिकांची गैरसोय झाली.
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातच वादळाचा तडाखा बसल्याने तत्काळ कर्मचारी मिळण्यात अडचणी आल्या. त्यावर उपाय म्हणून कणकवली आणि सावंतवाडी पालिकेने आपले काही कर्मचारी, कचरा वाहक ट्रॅक्टर काही दिवसासाठी शहराला उपलब्ध करुन दिले. उपलब्ध कर्मचारी यांच्यामार्फत जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. केला जात आहे. परंतु या सर्व कामात मालवणच्या जनतेने जे सहकार्या केले, लोकप्रतिनिधी यांनी कुठलेही राजकारण न करता सहकार्याची भूमिका घेतली, प्रशासनाने दिवसरात्र जी मेहनत घेतली त्यामुळेच मालवण शहर लवकर सुस्थितीत यायला मदत झाली. मोठे नैसर्गिक संकट असल्याने संपूर्ण मालवण शहर पूर्वपदावर येण्यासाठी थोडा कालावधी लागणार आहे. नगरपरिषद लवकरात लवकर सर्वकाही पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. जनतेने आता पर्यंत संयम राखून जसे सहकार्य केले त्याप्रमाणे आणखी थोडे दिवस नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही श्री. कांदळगावकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा