कुडाळ /-
कोविड-१९ लसीकरण मोहिमेत जिल्हा आरोग्य प्रशासनाचा सावळागोंधळ असून पहिल्या डोसाला विहित कालावधी उलटून देखील आरोग्य प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे दुसऱ्या डोससाठी मात्र जनतेच्या पदरी “प्रतिक्षाच” करायची वेळ आली आहे. तरी जिल्हा प्रशासनाने या बेजबाबदार कारभाराची वेळीच दखल घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मनसे कुडाळ तालुकध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केली आहे.
देशासह राज्यात कोविड-१९ लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यापासून मोहिमेतील नियोजनशून्य व्यवस्थापनामुळे व लसींच्या तुटवड्यामुळे अनेक कारणांनी जनतेला हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोवॅक्सिन या लसींचा पहिला डोस ४५ वर्षावरील बहुतांश लोकांना देण्यात आलेला आहे. वास्तविक कोविशिल्ड लसीसाठी दोन डोस आवश्यक असून त्याची कालमर्यादा २८ ते ४५ दिवसांची आहे. तर कोवॅक्सिन लसींसाठी दूसरा डोस २८ दिवसांच्या कालमर्यादेत घेणे अत्यावश्यक असल्याचे संबंधित कंपन्यांकडून कळते. मात्र आजमितीस लसींचा पहिला डोस घेऊन विहित कालावधी उलटून देखील नागरिकांना दुसऱ्या डोससाठी फरफट होताना दिसून येत आहे. त्यात जिल्हा आरोग्य प्रशासनाने दुसरा डोस न देण्याचे लेखी आदेश दिल्याने पहिला डोस घेतलेल्या नागरिकांच्या चिंतेत अधिक वाढ झालेली असून पहिल्या डोस नंतर विहित कालावधी उलटून गेल्याने तिच्या उपयोगीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शिवाय पहिला डोस घेतलेले नागरिक लसीकरण केंद्रांवर जाऊन कर्मचाऱ्यांना दुसऱ्या डोससाठी वारंवार विचारणा करत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या महामारीच्या काळात “एक ना धड अन भाराभर चिंध्या” अशी परिस्थिती उद्भवयला नको. यासाठी जिल्हा प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घेऊन दुसऱ्या डोससाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना करावी व नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मनसेची आग्रही मागणी आहे.