‘सौर दीप- माझा अभ्यास मित्र’ उपक्रम राज्यात पाचवा
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण ) पुणे मार्फत आयोजन
मसुरे /-
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण ) पुणे मार्फत सन २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मूळ देवगड तालुक्यातील हिंदळे येथील व सध्या नोकरी निमित्ताने पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वेवूर येथील शाळेचे विज्ञान पदवीधर शिक्षक श्री.अजित विश्राम दळवी यांच्या ‘सौर दीप- माझा अभ्यास मित्र’ या उपक्रमाला गट २ (प्राथमिक शिक्षक – मुख्याध्यापक) मधून राज्यातून पाचवा क्रमांक मिळाला आहे. पूर्व प्राथमिक ते माध्यमिक अश्या पाच गटातून ही स्पर्धा आयोजित करण्यात येते .सन २०२०-२१ या वर्षात राज्यातील एकूण ९७० स्पर्धकांनी आपले नवोपक्रम एससीइआरटी पुणेला सादर केले . गट क्र २ मधून ४६४ नवोपक्रम राज्यस्तरावर सादर केले.
राज्यस्तरावरून छाननी होऊन पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरावरून प्रत्यक्ष पडताळणी झाली .पालघर जिल्ह्यातून श्री .अजित दळवी यांच्या सौर दीप -माझा अभ्यास मित्र या नवोपक्रमाची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ,पालघर तर्फे एकूण १० नवोपक्रम मधून प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली होती. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम सादरीकरण स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला . ऑनलाईन पद्धतीने राज्यस्तरावरून झालेल्या सोहळ्यात राज्याचे शिक्षण संचालक श्री दिनकर टेमकर ,उपसंचालक श्री विकास गरड , सहसंचालक डॉ . विलास पाटील ,आणि नवोपक्रम संशोधक विभाग,पुणे संचालिका डॉ.गीतांजली बोरुडे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला .
‘सौर दीप -माझा अभ्यास मित्र’ या उपक्रमातून श्री अजित विश्राम दळवी यांनी जिल्हा परिषद शाळा वेवूर मध्ये सौर दीप बनवण्याचे ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देवून कार्यशाळा घेवून ७५ विद्यार्थ्यांना सौर दूत बनवले. विजेच्या लपंडावामुळे होणारे अध्ययनातील नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना सौर घट ,सौर पेनल,सौर दीप इ . साहित्य मोफत दिले . सदर उपक्रम कार्यशाळेस शाळा व्यवस्थापन समिती वेवूर अध्यक्ष व सर्व सदस्य ,मुख्याद्यापिका सौ कांचन पाटील, व शिक्षक वृंद सौ .अश्विनी राऊत ,श्री हरेश वैद्य ,श्री पुरुषोत्तम म्हात्रे , श्री मनीष मोरे ,सौ करुणा दळवी ,श्री .सुरेश कोळेकर यांनी सहाय्यक प्रशिक्षक बनून सहकार्य केले. सौर संच सुटे भाग करिता आर्थिक मदत कोकण कला व शिक्षण विकास संस्था ,मुंबई, निवृत्त मुख्याध्यापिका सौ विभूती ठाकूर , सरावली बोईसर येथील तलाठी सौ उज्वला पाटील व स्वतः श्री अजित दळवी यांनी निधी देवून केली . राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत पालघरचे नाव चमकवल्या बद्दल नवली केंद्राचे केंद्र प्रमुख श्री. विश्वास पावडे यांनी शिक्षक श्री अजित दळवी यांचे विशेष अभिनंदन केले .