वेंगुर्ला /-
२८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.विज्ञानाचे आज राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. विज्ञानाने आत्तापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारचे शोध लावले. त्यामुळे मानवी जीवनाला गती मिळाली. याच विज्ञानामुळे मानवी जीवनाचा कायापालट झाला. विज्ञानाच्या शोधामुळे मानव आपले संरक्षण करू लागला.आज आपल्याला मिळणाऱ्या सुखसोयी आणि झालेला विकास फक्त आणि फक्त विज्ञायामुळेच झाला आहे,असे प्रतिपादन बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले चे विज्ञान विभागाचे प्राध्यापक दिलीप शितोळे यांनी वेंगुर्ला येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने केले.
सन १९८७ पासून दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना, देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी, विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार मिळवलेले डॉ. सी. व्ही. रमन यांच्या सन्मानार्थ त्यांनी ज्या दिवशी त्यांचा शोध निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला आणि त्यांना पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला तो २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.विज्ञानाचे आज समाजामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. विज्ञानाने आत्तापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारचे शोध लावले. त्यामुळे मानवी जीवनाला गती मिळाली. याच विज्ञानामुळे मानवी जीवनाचा कायापालट झाला. विज्ञानाच्या शोधामुळे मानव आपल्या संरक्षण करू लागला.लोकांना दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विज्ञानाचे महत्त्व सांगणे, विज्ञानावरचे शक्य ते प्रयोग प्रदर्शित करणे, विज्ञानाच्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणे, विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे, देशातील वैज्ञानिक विचारांना प्रोत्साहित करणे, नवनवीन संधी देणे तसेच विज्ञान व तंत्रज्ञान लोकप्रिय करणे साठी २८ फेब्रुवारी या दिवशी विज्ञान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्तरापासून शालेय स्तरापर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून लोकांमधील वैज्ञानिक विचारांना चालना दिली जाते.
१९९९ पासून देशात विज्ञान दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबवल्या जातात. त्यामुळे नवनवीन विषय तसेच विज्ञानामधील चांगले-वाईट अनुभव व पुढील काही वर्षाचे नियोजन आपण आत्तापासूनच करू शकतो आणि पुढील काळातील होणारे नुकसान टाळू शकतो. १९९९ मध्ये आपले विश्व बदलणे ही संकल्पना, २००४ मध्ये समुदायातील उत्साहवर्धक वैज्ञानिक जागृती ही संकल्पना, तर २०१३ मध्ये मॉडिफाइड पिके व अन्नसुरक्षा सुधारणा या संकल्पनेवर भर देण्यात आला. चालू वर्षांमध्ये खास विकलांग व्यक्तींसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ही संकल्पना राबवण्यात येत आहे.आपल्याला मिळणाऱ्या सुखसोयी आणि झालेला विकास फक्त आणि फक्त विज्ञानामुळेच झाला आहे आणि आपण भविष्यात काय घडवू शकतो हे सुद्धा विज्ञानानेच ठरविले जाऊ शकते,असे मत यावेळी
बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्लेचे प्राध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सचिव प्रा.दिलीप शितोळे यांनी वेंगुर्ला येथे केले.