मालवण /-

मालवण पंचायत समितीच्या ‘ऐतिहासिक स्थळे’ स्वच्छता अभियानाचा शुभारंभ रविवारी (२८) सकाळी किल्ले रामगड येथे स्वच्छता मोहिमेने करण्यात आला.मालवण पंचायत समिती आणि स्वराज्य संघटना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या शासकीय नियमावलीचे पालन करून मोहीम राबविण्यात आली. एकाचवेळी जास्त गर्दी होऊ नये यादृष्टीने लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी व कर्मचारी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.

सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांच्या हस्ते शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वच्छता मोहिमेची सुरवात करण्यात आली. किल्ल्यावर उभ्या स्वरूपात असलेल्या सात तोफांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी माजी उपसभापती अशोक बागवे, विस्तार अधिकारी पी.डी. जाधव, श्री. गोसावी, श्री. कांबळे, रामगड सरपंच विलास घाडीगांवकर, उपसरपंच अमित घाडीगांवकर, असगणी सरपंच हेमंत पारकर, आडवली सरपंच श्री. आडवलकर, ग्रामसेवक श्री. दळवी, श्री. सावंत, समानवता ट्रस्ट सिंधुदुर्गचे कमलेश गोसावी, किल्ले प्रेमी उदय रोगे, स्वराज्य संघटना सिंधुदुर्गचे साईश माशेलकर, प्रथमेश वेरलकर व अन्य सदस्य स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

अन्य ऐतिहासिक स्थळांवर लवकरच स्वच्छता मोहीम

सामाजिक बांधिलकीतुन एक सामाजिक उपक्रम म्हणून मालवण पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील ऐतिहासिक स्थळांच्या साफसफाईचा उपक्रम निश्चित करण्यात आला आहे. तालुक्यातील अन्य किल्ले व कातळशिल्प येथेही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.
काही ऐतिहासिक स्थळे आज दुर्लक्षित आहेत, मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. यांचे जतन व संवर्धन काळाची गरज असल्याची भावना सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांनी व्यक्त केली.

‘किल्ले रामगड’

मालवण पासून सुमारे ३० कि.मी अंतरावर तर कणकवली येथून १२ कि.मी. ‘रामगड’ हे गाव आहे. गावाच्या जवळच रामगड किल्ला आहे. गडाचे प्रवेशद्वार ८ फुट उंच आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला १८ फूट उंच बुरुज आहेत. किल्ल्यात वैशिष्ठ म्हणजे ७ तोफा रांगेत उलट्या पुरुन ठेवलेल्या दिसतात. त्यातील सर्वात मोठी तोफ ७ फूट लांबीची आहे. या तोफांसमोरच किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार पडझड झालेल्या स्थितीत आहे. या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या तटबंदीवरुन गड नदीचा प्रवाह दिसतो. गडाला १८ फूट उंचीचे १५ बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजाला ३ दिशांना टेहळणी स्वरूपातील खिडक्या आहेत. बुरुजांच्यामध्ये १८ फूटी तटबंदी असून तीने पूर्ण किल्ल्याला वेढलेले आहे. तटबंदीची लांबी अंदाजे ६४० मीटर आहे. त्याकाळी गड नदीतून होणाऱ्या मालाच्या वाहतुकीवर नजर ठेवणारा हा किल्ला शिवकालीन बांधकामाची वैशिष्ठ जपणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page