शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची टीका ….
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे पोट ठेकेदार कोण? ते जाहीर करा…
मालवण /
राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे महाआघाडी सरकार कोरोना महामारी विरोधात यशस्वीपणे लढत असून आरोग्य विभागावर खर्च करतानाच विकासकामेही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र इंधन दरवाढ, बेरोजगारी, शेतकरी विरोधी कायदा, महागाई, मच्छीमारांच्या समस्या आदी प्रश्न सोडविण्यास भाजपप्रणित केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. म्हणूनच केंद्र सरकारच्या अपयशी कामगिरीवर पडदा घालण्यासाठी आणि महाआघाडी सरकार स्थिरावतेय या भीतीने स्थानिक भाजप पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना राज्यातील महाआघाडी सरकार विरोधात आंदोलने करावी लागत आहेत, अशी टीका जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
भाजपवाल्यानी नुसत्या बोंबा मारण्यापेक्षा कामे करावीत असा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
शिवसेना शाखा येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महेंद्र म्हाडगुत, बाळू नाटेकर, मोहन मराळ, यशवंत गावकर, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. खोबरेकर म्हणाले, कोरोना महामारीचा सामना करताना राज्यातील आघाडी सरकारने आरोग्य विभागावर जास्त खर्च केला. यात जिल्ह्याला जास्त लाभ मिळाला याचे आम्हाला समाधान आहे. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले तसेच कोव्हिड टेस्टिंग लॅब सुरू झाली. कोरोनावर नियंत्रण मिळविताना लॉकडाऊनमुळे थांबलेली विकासकामेही राज्य सरकार मार्गी लावत आहे. खड्डे पडलेल्या मालवण- कसाल रस्त्याचे काम लॉकडाऊन काळात होऊ शकले नाही. या रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामासाठी ४ कोटींचा निधी मंजूर असून आता हे काम डांबर प्लांट कार्यान्वित झाल्यावर लवकरच सुरू होईल. तरीही केंद्र सरकारचे अपयश लपविण्यासाठी आणि आघाडी सरकार स्थिरावून चांगले काम करेल या भीतीने मालवण कसाल रस्त्यावर खड्ड्यांच्या प्रश्नावर भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. ही आंदोलने नुसत्या बोंबा मारण्याचे काम असून हे माहीत असल्याने त्यांना एका गावात लोकांनी आंदोलन करू न दिल्याने दुसऱ्या गावात आंदोलन करावे लागले. हे त्यांचे अपयश आहे. तालुक्यात मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या रस्ते कामाचे पोट ठेकेदार कोण ? हे भाजपवाल्यानी जाहीर करावे. डराव डराव करणाऱ्यांसोबत आम्ही थांबणार नाही, असा टोलाही खोबरेकर यांनी लगावला.
वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय सुरू होण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. याबाबत लवकरच निर्णय होऊन वॉटरस्पोर्ट्स सुरू होतील अशी आशा खोबरेकर यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील जनतेसाठी ज्या सुविधा राज्यसरकारने आणल्या आहेत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. मालवण ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस मशीन काही तांत्रिक अडचणींमुळे कार्यान्वित झालेली नाही. त्यासाठी स्वतंत्र पाण्याची पाईपलाईन जोडणी आवश्यक असून ती पूर्ण झाल्यावर मशीन कार्यान्वित होईल. जी कामे थांबली आहेत त्यांना चालना देण्याचा प्रयत्न येत्या काळात केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.