कुडाळ /-
जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. महामार्गाचे काम चालु झाल्यापासून आतापर्यंत स्थानिक जनता, लोकप्रतिनिधी आदींनी कामाच्या दर्जावरून वेळोवेळी टीका केली आहे. तसेच यासंदर्भात आंदोलनेही झाली. आता महामार्गावर दिशादर्शक तसेच मार्गदर्शक सूचनांचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांमधील मराठी व्याकरणाच्या अक्षम्य चुकांची भर दिलीप बिल्डकॉन आस्थापनेकडून करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील मराठी भाषाप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. दोषी आस्थापनेसह संबंधित अधिकार्यावर तातडीने कारवाई करण्यासह चुकीचे फलक त्वरीत पालटून घ्यावेत, असे निवेदन सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
फलकांवरील अशुद्ध मराठी भाषेच्या चुका आणि वाक्यांनी त्यात भर पडली आहे. फलकांवरील मराठीच्या शुद्धीकरणासाठी आता आंदोलन करावे लागेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वीही महामार्गावर लावण्यात आलेल्या गावांच्या नावांमध्येही अशा चुका करण्यात आल्या होत्या. हे फलक सिद्ध करताना मराठी जाणकारांचे साहाय्य घेण्याची आवश्यकता असते. मात्र ठेकेदार याकडे पूर्णत दुर्लक्ष करत आहे. महाराष्ट्रातच होणारी मराठीची ही विटंबना थांबवण्यासाठी शासनाने तातडीने यावर कार्यवाही करावी व अशुद्ध लेखन असलेले फलक पालटावेत अशी मागणी होत आहे, असे समितीच्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना समितीचे श्री. गजानन मुंज, श्री. सुरेश दाभोळकर, शिवसेना विभागप्रमुख डॉ. सूर्यकांत बालम व श्री. रवींद्र परब उपस्थित होते.