मुंबई/
सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजावून घेत त्या तत्काळ सोडविल्या जातील असे शिवसेना उपनेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज शिवसेना राज्य संपर्क कार्यालय ‘शिवालय’ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात झालेल्या जनता दरबार मध्ये सांगितले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद दिला.श्री. सामंत म्हणाले, आजचा कार्यक्रम पूर्णपणे सामाजिक अंतर राखून कोविड -१९ च्या केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून यशस्वीपणे पार पडला. यावेळी लोकांची गर्दी होणार नाही आणि कार्यकर्त्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली. सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले.
ज्या नागरिकांना आपल्या कामासाठी मंत्रालयात येणे शक्य होत नाही, अशा सर्व कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मी सदैव उपलब्ध असतो. तरीही काहींना भेटणे शक्य होत नाही अशा नागरिकांसाठी या माध्यमातून भेटणार आहे.शिवसैनिकांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीगाठी घेणे हा उद्देश यामागे आहे. विशेषतः कार्यकर्ते आणि नागरिकांना येणाऱ्या अडचणी ही या माध्यमातून सोडविल्या जातील, असेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.
श्री. सामंत म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी दर बुधवारी सकाळी १० ते दुपारी १२ यादरम्यान मुंबईस्थित ‘शिवालय’ या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात उपलब्ध असणार आहे. याची सुरूवात आज बुधवार दिनांक ९ सप्टेंबर २०२० रोजी पासून झाली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही नोंदणीची आवश्यकता नाही.
यावेळी इतर खात्यातीलही कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्याचे निराकरण करण्यात आले. या जनता दरबार मध्ये ३०० पेक्षा अधिक नागरिक व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता, असेही श्री. सामंत यावेळी सांगितले.कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, पालक, सामान्य नागरिक, शिवसैनिक, शिक्षक, विद्यार्थी संघटना प्रतिनिधी, जेष्ठ नागरिक, ग्रंथालय कर्मचारी, वकील संघटना प्रतिनिधी, पोलीस कर्मचारी, लोकप्रतिनिधी, इत्यादी सहभागी झाले होते. आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण झाल्यामुळे समाधान व्यक्त केले.