कणकवली /-
कणकवली – देवग येथे महावितरणच्या विद्युत वाहिनीचे काम करत असताना चार वर्षापूर्वी स्वप्नगंधा कंपनीकडून कोटकामते येथील बगयातीला आग लागली होती. याबाबत आजही या बगतदारांचे नुकसान करणाऱ्या या कंपनीवर वीज वितरण कंपनीकडून कोणतीही कारवाई झलेली नाही. तरी या कंपनीचे ठेके बंद करून या कंपनीच्या माध्यमातून जी कामे झाली आहेत त्या कामांची कॉलीटी कंट्रोलच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर व पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची कुडाळ येथे भेट घेऊन केली आहे. दरम्यान या कंपनीवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन अधीक्षक अभियंत्यांनी यावेळी दिले आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, राष्ट्रवादीचे जेष्ठ पदाधिकारी सुंदर पारकर, देवेद्र पिळणकर, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष सागर वारंग, जयेश परब आदि उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वप्नांगंधा कंपनीच्या माध्यमातून केले जाणारे महावितरणचे काम संशयास्पद आहे.कमी दर्जाच्या वायरचा वापर तसेच लोकांना स्थानिक जमीन मालकांना विश्वासात न घेता पोल टाकणे अशी कामे चालू आहेत. जिल्हयात स्वप्नगंधा व कमलादेवी अशा दोनच कंपनीना वारंवार ठेका दिला जातो.सदर कंपनीच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत. यापैकी स्वप्नगंधा कंपनीचे देवगड येथे काम सुरु होते. यावेळी कोटकामते येथे जुना विद्युत पोल चोरण्याच्या उद्देशाने कापत असताना ८ बागायतदारांच्या हापूस बागेला आग लागली होती. यावेळी संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते मात्र या कंपनीच्या मुकादमावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आपला पोल चोरत असताना हि आग लागली होती हे लक्षात घेता आपली मालमत्ता चोरीला जात असल्याची तक्रार वीज वितरण कंपनीने देणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांचे साटेलोटे असल्याने अशी तक्रार दिली गेलेली नाही. हे बाबही या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता यांच्या लक्षात आणून दिली आहे.
या आगीत सुमारे १ कोटीचे नुकसान झाले होते. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या हा विषय न्यायप्रविष्ट आहे. गेली ४ वर्ष हे सर्व गरीब बागातदार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना संबधित अधिकारी मात्र या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असून या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. असेही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत व पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांच्या लक्षात आणून दिल आहे.
या आगीत कोटकामते येथील नामदेव गोपाळ मसुरकर, रवींद्र माधव खाजनवाडकर, वसंत भीमसेन मसुरकर, वासुदेव दत्ताराम मसुरकर, कल्याणी विठ्ठल मसुरकर, विष्णू भीमसेन मसुरकर, योगेश यशवंत लोके, अशोक गणपत वाळके या बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.या सर्व बगतदारांची व्यथा मांडताना राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी आंदोलन करणार असल्याचाही इशारा दिला आहे. तसेच या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आम्ही लक्ष वेधले असून संबंधित कंपनीला योग्य तो धडा शिकवणार असल्याचेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.