कुडाळ /-
सिंधुदुर्गातील एसटी डेपोंची परिस्थिती आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी झाली आहे.जिल्ह्यातील एसटी डोपोच्या या दयनीय स्थितीला विभाग नियंत्रक हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष जे. डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकातून केला आहे.
या प्रसिध्दी पत्रकात बनी नाडकर्णी यांनी म्हटले की, सध्या कोरोनामुळे ३ महिने कामगारांचा पगार झाला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एवढया कठीण परिस्थितीमध्ये विनापगारी कुठलीही साधने प्रशासनाने पुरवली नसताना कामगारांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार प्रशासनाकडून होत आहे.
एका बाजूला एसटी प्रशासनाकडे पैसा नाही असे सांगणाऱ्या प्रशासनाला कंत्राटी बेसीसवर सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकाला पगार देणे कसे काय परवडते, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या विभाग नियंत्रकावर कोणाचा वरदहस्त आहे, याचा पर्दाफाश महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना येत्या काळात करणार आहे, असे नाडकर्णी म्हणाले.
सध्या एमईओच्या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या पगारात एक लहान-सहान इन्फ्रीमेंट करुन एसटी प्रशासनाला सहज सदर व्यक्तीला पदोन्नती देणे शक्य आहे, मग अशा अकार्यक्षम विभाग नियंत्रकाला पुन्हा सेवेत कंत्राटी पद्धतीवर रुजू करुन त्याच्यावर एवढी मेहेरबानी कोणाची होत आहे, हे आता जनतेला कळणे आवश्यक आहे.
या विभाग नियंत्रकाची कार्यपद्धती कुडाळ डेपो मॅनेजर असताना कुडाळ वासियांनी चांगलीच अनुभवली आहे. फक्त सयाजीरावाची भूमिका असलेल्या विभाग नियंत्रकाला त्वरीत सेवेतून कमी करून त्या जागी एमईओची बढती करुन त्यांना विभाग नियंत्रकाचा कार्यभार सोपवावा जेणेकरून एस.टी. प्रशासनाची वर्षाकाठी लाखो रुपयांची बचत होईल,.असा सल्ला नाडकर्णी यांनी दिला. लवकरच या प्रश्नी लेखीपत्र परिवहन मंत्र्यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.