आचरा /-

वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी आणि खरेदी साठी होणारी गर्दी लक्षात घेऊन व्यापारी बांधवांच्या सुरक्षेसाठी चार दिवस अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय आचरा व्यापारी बांधवांच्या शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत स्वयंस्फूर्तीने घेण्यात आला आहे.
आचरा आणि परीसरातील गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दुसऱ्या लाटेतील संक्रमण झपाट्याने होत असल्याने सकाळी आठ ते अकरा या वेळेत खरेदी साठी होणारी गर्दी लक्षात घेऊन व्यापारी बांधवांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना करणे गरजेचे बनले होते. या दृष्टीने आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या व्यापारी बांधवांच्या बैठकीत तीन मे ते सहा मे या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद ठेवण्याबाबत निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. याकाळात दुध विक्री सह सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय उपस्थित व्यापारी बांधवांतर्फे घेण्यात आला. या वेळी व्यापारी संघटना उपाध्यक्ष मंदार सांबारी, माणिक राणे , सचिव निखिल ढेकणे, खजिनदार जयप्रकाश परूळेकर, पंकज आचरेकर, विद्यानंद परब, आशिष बागवे,परेश सावंत, प्रफुल्ल नलावडे,नंदू कावले, शैलेश वळंजू,उदय घाडी, अमोल माळगांवकर, प्रफुल्ल घाडी, आशिष पेडणेकर सायली आचरेकर यांसह सर्व अत्यावश्यक सेवेतील व्यापारी बांधव आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित व्यापारी बांधवांतर्फे आचरा ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी गणेश परब तसेच पोलीस कर्मचारी यांची भेट घेऊन सदर निर्णय कळविण्यात आला.यावेळी घेण्यात आलेल्या चार दिवसांच्या संचार बंदी काळात बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा संबंधित विभागाकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page