वेंगुर्ले शहरातील खोदलेल्या सर्व रस्त्यांची कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी पूर्ण करा : ऍड.मनिष सातार्डेकर

वेंगुर्ले शहरातील खोदलेल्या सर्व रस्त्यांची कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी पूर्ण करा : ऍड.मनिष सातार्डेकर

वेंगुर्ला /-
वेंगुर्ले शहरात सध्या भूमिगत विद्युतवाहिनी तसेच भूमिगत गॅस पाईपलाईन घालण्याची कामे सुरू असून सर्वच रस्ते दुतर्फा खोदण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी रस्त्यावर चर पडलेले आहेत याचा प्रचंड त्रास शहरातील नागरिक व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.पावसाळा हंगाम तोंडावर आल्याने ही कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण न झाल्यास दोन्ही बाजूचा रस्ता खचून सर्वच ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरणार आहे.तसेच सदरची माती रस्त्यावर आल्याने मोठा अपघात होण्याची देखील शक्यता आहे.त्यामुळे सदरची कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे.सद्यस्थितीत शहरात सर्वच ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत. मात्र ते पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही. तसेच सुरू असलेली कामे अतिशय संथगतीने सुरू असून त्यांच्यावर वेंगुर्ले नगर परिषदेच्या कोणताही अंकुश नाही. त्यामुळे ही कामे ठेकेदार आपल्या मनाप्रमाणे करीत आहे व शहरातील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर टाकलेल्या मातीमुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरत आहे. तसेच सध्या कोरोना महामारी वेगाने पसरत असून अशा धुळीच्या साम्राज्यामुळे ही महामारी अधिक पसरण्याचा धोका देखील उद्भवणारा आहे. त्यामुळे नगर परिषदेने या बाबीवर गांभीर्याने लक्ष देऊन सदरची कामे योग्यरित्या होण्यासाठी ठेकेदारांना वेळीच योग्य ते आदेश द्यावेत. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील खोदलेल्या सर्व रस्त्यांची कामे ठेकेदाराकडून त्वरित पूर्ण करून घ्यावीत.अन्यथा सदरच्या खोदलेल्या रस्त्यांमुळे एखादा मोठा अपघात वा मोठी हानी झाल्यास व त्यात कोणाला आपले प्राण गमवावे लागल्यास त्यास केवळ संबंधित ठेकेदार तसेच वेंगुर्ले नगरपरिषद व वेंगुर्ले नगर परिषदेचे संबंधित अधिकारी हेच जबाबदार राहतील,असे निवेदनात म्हटले आहे.याबाबत पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील खोदलेल्या सर्व रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत, अशी मागणी ऍड. मनिष सातार्डेकर यांनी वेंगुर्ले नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अभिप्राय द्या..