लसीचा दुसरा डोस ग्रामीण रुग्णालयात देणार….
तहसीलदार, नगराध्यक्षांची माहिती ..
मालवण /–
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी आता पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात नागरिकांना लस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रशासनाने नाट्यगृहास भेट देत पाहणी केली. पुढील लस उपलब्ध झाल्यानंतर पालिकेच्या नाट्यगृहाच्या ठिकाणीच नागरिकांना लस दिली जाणार आहे तर लसचा दुसरा डोस हा ग्रामीण रुग्णालयात दिला जाणार असल्याची माहिती तहसीलदार अजय पाटणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या येथील ग्रामीण रुग्णालयात ४५ वर्षावरील स्त्री, पुरूष नागरिकांना लस दिली जात आहे. मात्र ही लस घेण्यासाठी पहाटे साडे तीन वाजल्यापासून नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने आता पालिकेच्या नाट्यगृहात लस देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी तहसीलदार अजय पाटणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, बांधकाम सभापती मंदार केणी यांनी पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहास भेट देत पाहणी केली.
सध्या ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी लस दिली जात आहे. मात्र तेथे होणारी गर्दी टाळण्यासाठी आता पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेव्हा पुढील लस उपलब्ध होईल तेव्हापासून नाट्यगृहाच्या ठिकाणीच नागरिकांना लस दिली जाणार आहे. यासाठी नाट्यगृहाच्या ठिकाणी स्त्री, पुरूषांसाठी आरोग्य सेतू रजिस्ट्रेशनची सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वतंत्र रांग असणार आहे. बैठक व्यवस्था तसेच पाण्याची तसेच अन्य अत्यावश्यक सुविधा याठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती तहसीलदार अजय पाटणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.
लस घेण्यास येणार्या नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. ज्यांच्या चेहर्यावर मास्क नसेल त्यांच्यावर ऑन दी स्पॉट कारवाई केली जाणार आहे. नाट्यगृहाच्या ठिकाणी लस घेण्यास येणार्या नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. सर्व नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून लस घेत सहकार्य करावे असे आवाहन श्री. कांदळगावकर यांनी केले आहे.
सध्या शहराबरोबरच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होत आहेत. या नागरिकांच्या हातावर क्वारंटाइनचे शिक्के मारले असतानाही ते बाजारपेठांमध्ये फिरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ग्रामीण भागात अशा नागरिकांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्थानिक गाव समितीची आहे. त्यामुळे अशा लोकांना गावपातळीवर नियमांचे पालन करण्याच्या सूचना करण्यात याव्यात. ज्या नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के आहेत तसेच ज्या नागरिकांनी आरटीपीसीआर केले आहे पण त्यांचे अहवाल प्राप्त झालेले नाही अशा नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अशा व्यक्ती फिरताना आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिस निरीक्षक श्री. ओटवणेकर यांनी सांगितले.
