मसुरे /-
कोरोनाची दुसरी लाट राज्य भरात थैमान घालत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा रुग्ण वाढ झपाट्याने होत आहे. प्रशासनाने पुन्हा एकदा कोरोना नियंत्रणासाठी गावातील ग्राम सनियंत्रण समितीवर जबाबदारी टाकली आहे. परंतु याबाबत प्रत्यक्ष कृती करण्यासाठी सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर सोडली आहे. सरपंचांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य क्रम देणे आवश्यक असताना तशा प्रकारचे कोणतेही आदेश सध्यातरी काढले न गेल्याने ग्रामस्तरावर नाराजी पसरली आहे. गाव सुरक्षित राखणाऱ्या सनियंत्रण समिती सदस्य व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी कांदळगाव सरपंच सौ उमदी उदय परब यांनी केली आहे.
गतवर्षी कोरोना महामारी सुरू झाल्यापासून ग्राम स्तरावर कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. शाळा सॅनिटाईज करणे, बाहेरील ग्रामस्थांची नोंद ठेवणे, रुग्णांचा आढावा घेणे, शासनाला वेळोवेळी अवगत करणे अशा विविध कामानमध्ये सरपंच, समिती सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आघाडीवर होते. यावेळी सुद्धा परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाऊ लागल्या नंतर प्रशासनाने पुन्हा एकदा ग्राम सनियंत्रण समितीला अधिकार दिले आहेत. परंतु कर्मचाऱ्यांची सुरक्षा करणे बाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही आहे. आमदार नितेश राणे यांनी सुद्धा याबाबत पालकमंत्री , खासदार याना कर्मचाऱ्यांचा विमा काढण्याच्या गतवर्षीच्या घोषणेची नुकतीच आठवण करून दिली आहे. शासन व प्रशासनाने केवळ घोषणा न करता ग्राम सनियंत्रण समिती सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या लसीकरणास प्राधान्य देण्या बरोबरच विमा सुरक्षा देण्याची मागणी सरपंच सौ उमदी उदय परब यांनी केली आहे.