जेष्ठ नाट्य निर्माते मामा पेडणेकर काळाच्या पडद्याआड!

जेष्ठ नाट्य निर्माते मामा पेडणेकर काळाच्या पडद्याआड!

मसुरे /-

मसुरे कावावाडीचे सुपुत्र व मसुरे भंडारी समाज सेवा संघ मुंबईचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध नाट्य निर्माते श्री उत्तम भदू उर्फ मामा पेडणेकर (९८ वर्ष) यांचे वार्धक्याने मुंबई येथे शुक्रवारी निधन झाले.मराठी नाटयसंघाचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी संतोषी थिएटर्स संस्थेच्या वतीने जय देवी संतोषी माता,बायका त्या बायकाच,नाते युगायुगाचे,
मृत्युंजय,छावा,पंखांना ओढ पावलांची,नटसम्राट (यशवंत दत्त, सुलभा देशपांडे),राजसंन्यास आदी नाटकांची निर्मिती केली होती.
१९८० च्या काळात षण्मुखानंद हॉल, माटुंगा येथे जनता दराने प्रयोग आयोजित करण्यासाठी त्यांनी अनेकदा पुढाकार घेतला होता.
१९७८ पासून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. शिवाजी मंदिरात बुकिंग क्लार्क म्हणून त्यांनी काम पाहिले होते. नव्या कलाकारांना देखील मामा घरचे वाटायचे. कसलीही मदत करताना मामा पेडणेकर पुढाकार घ्यायचे. नवीन नाटक किती आणि कसं चालेल हे मामा परखडपणे सांगायचे मराठी रसिकांना आपलीशी वाटणारी नाट्यगृहे कमी पडतात याचा अंदाज आल्यावर घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या शेजारचं गुर्जर रंगभूमीला वाहिलेलं झवेरबेन पोपटलाल नाट्यगृह मामांनी मराठी नाटक आणि रसिकांना खुलं केलं. उपनगरीय रसिकांना त्यामुळे सोयीचं ठरलं.यशस्वी बुकिंग क्लार्क म्हणून जम बसल्यावर मामा पेडणेकर निर्माते बनले. त्यांचे दोन्ही मुलगे नाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत. मामा पेडणेकर यांच्या पश्चात मुलगे, सुना, पुतणे नातवंडे असा परिवार आहे.नाट्य निर्माते दिनू पेडणेकर व परमानंद पेडणेकर यांचे ते वडील तर मसुरे भंडारी समाज संघ मुंबईचे अध्यक्ष शरद पेडणेकर, सर्प मित्र रमण पेडणेकर यांचे काका तर युवा कार्यकर्ते समीर पेडणेकर यांचे आजोबा होत.

अभिप्राय द्या..