सिंधुदुर्गनगरी /-
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. आपल्या मुलांसह गावातील मुले आपल्या शाळेत दाखल होतील, यासाठी प्रयत्न करावे. विद्यार्थी तुमचे शिष्य म्हणून ओळखले गेले पाहिजेत. यासाठी प्रयत्न करा. तसेच गतवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कोरोना काळात प्रशासनाला मदत करा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यानी शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना केले. सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेचे २०१९-२० चे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सौ सावंत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्राजित नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सभापती महेंद्र चव्हाण, शर्वाणी गांवकर, अंकुश जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, निरंतर शिक्षणाधिकारी अनिल तिजारे, जिल्हा परिषद गटनेते रणजीत देसाई, सदस्य विष्णुदास कुबल, संपदा देसाई, उन्नती धुरी, लॉरेन्स मान्येकर, श्रिया सावंत, नूतन आईर, प्रितेश राऊळ, सुनील म्हापणकर, सुधीर नकाशे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, विनायक पिंगुळकर यांच्यासह पुरस्कार प्राप्त शिक्षक व नातेवाईक उपस्थित होते. प्रत्येक तालुक्यातून एक आणि एक विशेष पुरस्कार अशा एकूण नऊ पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. यामध्ये श्रीमती प्रतिमा राजेश पेडणेकर (वेंगुर्ले), हरिश्चंद्र कृष्णा सरमळकर (देवगड), श्रीमती प्रतिमा खंडेराव कोतवाल (कणकवली), प्रशांत पांडुरंग रासम (वैभववाडी), परशुराम सिताराम गुरव (मालवण), दत्ताराम सातु सावंत (सावंतवाडी), सुनील नारायण फडके (दोडामार्ग), सिताराम गजानन म्हाडगुत (कुडाळ), श्रीमती परीणी संजय बगळे (विशेष पुरस्कार-कुडाळ) यांना शाल, श्रीफ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.