लॉकडाऊनची शक्यता टळलेली नाही;संयम बाळगा:मुख्यमंत्री ठाकरेंचे राज्याला आवाहन..
मुंबई /-
राज्यात कोरोना साथीचा विस्फोट झाला असताना आता नव्या काय उपाययोजना करणार याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी जनतेशी संवाद साधला. एप्रिलपर्यंत संयम बाळगावा लागेल. लॉकडाउनचा धोका टळलेला नाही, असं ठाकरेंनी सांगितलं. महाराष्ट्रा शुक्रवारी रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेला समाजमाध्यमांच्या माध्यमातून संबोधित केलं. यामध्ये संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्याच्या ऐवजी निर्बंध कठोर करण्याचं सूतोवाच केलं आहे. काय म्हणाले उद्धव ठाकरे? लॉकडाउन करणार का याचं थेट उत्तर मुख्यमंत्र्यांनी देण्याचं टाळलं. ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी यंदाही उपमुख्यमंत्र्यांनी चांगला अर्थसंकल्प मांडला. संकटातही महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही. काही दिवसांपूर्वी होळी, धुळीवंदनानंतर राज्यात शिमग्याला सुरुवात झाली. मात्र त्याविषयी नंतर बोलता येईल. मी तुम्हाला सातत्याने लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली आहे. ही शक्यता अजूनही टळलेली नाही. गेल्या महिन्यात राज्यातील सर्व नागरिकांनी माझं म्हणणं ऐकलं आणि त्यानुसार अंमलबजावणी केली.” “गेल्या काही दिवसात लग्न समारंभ, राजकीय मोर्चे, कार्यक्रम थाटामाटात साजरे झाले. त्यावेळीही मी यावर नियंत्रण आणण्याचं आवाहन केलं. मार्चच्या आधीपासून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात कोरोनाने अक्राळ विक्राळ रुप धारण केलं आहे”, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी धोका टळलेला नाही हे स्पष्ट केलं.