कुडाळ /-
“स्त्री सक्षमीकरणामध्ये खंबीर मानसिकता महत्त्वाची असते. ती स्वतःची असो, घरातील असो, की समाजातील असो. स्वतःला कमी न लेखता पुरुषाच्या बरोबरीने कार्य करण्याची तयारी ठेवा, सबलीकरणामध्ये इतरांच्या सहकार्यावर विसंबून न राहता स्वतःच्या कौशल्य विकासातून सबल बना. “.असे उद्गार अॅडव्होकेट नीलांगी रांगणेकर -सावंत यांनी काढले. त्या बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होत्या.
यावेळी त्यांच्या सोबत तेंडोलीच्या कृषी विस्तार अधिकारी जलाकार ,कोव्हिड योद्धा पुरस्कार विजेत्या कल्पना उर्फ रश्मी कुडाळकर, संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर, संस्थेच्या व्यवस्थापकीय अधिकारी मर्ल फोनसेका, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. कल्पना भंडारी, मानव संसाधन अधिकारी (एच आर ओ) पियुशा प्रभुतेंडोलकर, सेंटर स्कूलच्या प्रियांका सिंह, पल्लवी कामत ,प्रा. चेतन प्रभू, प्रा.अरुण मर्गज,प्रा. परेश धावडे इत्यादी उपस्थित होते.
तसेच महिला दिनाच्या निमित्ताने पोस्टर स्पर्धा, फोटो स्पर्धा, चारोळी स्पर्धा, “तिला” पत्र स्पर्धा इ.स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते. महिला सबलीकरणासंदर्भात भावना प्रभू व ऋचा कशाळीकर यांनी एक उत्तम रिदमिक ड्रामा परफॉर्मन्स सादर केला. मुलींच्या वतीने सौ. नागापुरे, कुमारी जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमांमध्ये राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा.अरुण मर्गज ,कल्पना उर्फ रश्मी कुडाळकर व अॅड. नीलांगी रांगणेकर -सावंत यांचा संस्थेतर्फे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अरुण मर्गज यांनी,सूत्रसंचालन प्रा परेश धावडे यांनी तर उपस्थितांचे आभार गौतमी मेस्त्री हिने मानले.