मालवण /-
मालवणचे माजी सभापती आणि सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे माजी अध्यक्ष तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष,कट्टा गावचे रहिवाशी डॉ. चंद्रकांत उर्फ दादासाहेब विठ्ठल वराडकर (वय ९४) यांचे आज सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या निधनाने या सर्वच क्षेत्रांचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
कट्टा येथील डॉ. दादासाहेब वराडकर यांचा जन्म ६ एप्रिल १९२६ रोजी झाला होता. त्यांनी आपले पूर्वमाध्यमिक शिक्षण कट्टा येथील वराडकर हायस्कूल मध्ये तर मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण मालवणच्या भंडारी हायस्कूल मध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नागपूर येथील नागपूर आयुर्वेद महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून मुंबई विद्यापीठात होमिओपॅथीक व बायोकेमिक प्रॅक्टीसचा कोर्स केला त्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठाची एमबीबीएस- होमिओ पदवी प्राप्त केली. तसेच संगीत, हार्मोनियम व तबला वादन, टाइप रायटिंग, शिवणकाम आदी विविध कलांमध्येही ते पारंगत होते. त्यांचे वडील डॉ. विठ्ठल उर्फ काकासाहेब वराडकर यांनी स्थापन केलेल्या कट्टा येथील वराडकर हायस्कूल मध्ये त्यांनी काही वर्षे शिक्षक म्हणून ही काम केले त्यानंतर पुढे त्याच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून १९७७ पासून त्यांनी जबाबदारी सांभाळली तर पुढे विश्वस्त म्हणून काम पाहिले.
राजकीय क्षेत्रात वावरताना १९६२ ते १९७७ या काळात त्यांनी अखंड रत्नागिरी जिल्ह्यात जि. प. सदस्य म्हणून काम केले. तर १९६२ ते १९६५ या पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी मालवण तालुका पंचायत समितीचे उपसभापती भूषविले होते तर १९७२ ते १९७५ या कालावधीत त्यांनी मालवण पंचायत समितीचे सभापती पद भूषविले. डॉ वराडकर यांनी लायन्स क्लब मालवणचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले होते व त्यानंतर लायन्स झोन चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणूनही त्यांनी कार्य केले. तर भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या मालवण स्थानिक कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी बरीच वर्षे काम केले.
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. तर दुर्गादेवी मंदिर देवस्थान मंडळ कुणकावळेचे स्थानिक कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. कट्टा पंचक्रोशीत वैद्यकीय सेवा देताना त्यांनी अनेकांचे प्राण वाचविले अत्यल्प मोबदला घेऊन ताप, सर्दी, संधिवात, आमांश, गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आदी व इतर आजारांवर डॉ. दादासाहेब वराडकर हे रामबाण उपचार देत असल्याने दूरवरचे रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येत. शैक्षणिक वैद्यकीय व राजकीय क्षेत्रात वावरत असतानाही डॉ. वराडकर यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले. मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांनी आपल्या शिक्षण संस्थेचे कनिष्ठ महाविद्यालय व इंग्लिश मिडीयम स्कुलही सुरू केले. गरजू व्यक्ती व विद्यार्थ्यांना त्यांनी नेहमी मदतीचा हात दिला.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, दोन सुना, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. सुकळवाड येथील डॉ उल्हास वराडकर यांचे तसेच कट्टा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेक्रेटरी विजयश्री देसाई आणि शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर यांचे ते वडील होत. तर वृत्त निवेदक ऋषी देसाई यांचे ते आजोबा होत. उद्या रविवारी सकाळी १० वाजता कट्टा येथील स्मशानभूमीत डॉ. वराडकर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.