मसुरे /-
बांदिवडे व भगवंतगड ही दोन गावे जोडणाऱ्या खार बंधाऱ्याचे काम रखडल्याने सदर कामास प्रारंभ न झाल्यास बांदिवडे ग्रामपंचायतच्या वतीने १ मार्च २०२१ पासून बंधाऱ्याच्या ठिकाणी बेमुदत उपोषणास बसण्याचा जाहीर केलेला निर्णय स्थगित करण्यात आला आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी खारभूमी विकास विभागाचे डेप्युटी इंजिनिअर सुधीर वेल्हाळ यांनी बांदिवडे ग्रामपंचायत कार्यालय येथे भेट देत खारभूमी कार्यालयाकडून घेतलेल्या निर्णयाची लेखी प्रत सरपंच यांच्या जवळ सुपूर्द केली आहे.
बांदिवडे खारभूमी योजनेच्या उघाडीच्या नुतनीकरणाचे कामाबाबत ५ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे ठेकेदारास उपस्थित राहण्यास कळविण्यात आले आहे.सदर ठेकेदाराने काम चालू करण्यास प्रतिसाद न दिल्यास वरिष्ठ कार्यालयास कळवून ठेकेदारावर निविदा अटी व शर्ती नुसार कारवाई करण्यात येईल व वेळप्रसंगी वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीने सदर ठेका रद्द करून पुनःस्च निविदा प्रक्रिया करून काम करण्यात येईल अशा आशयाचे सिंधुदुर्ग खारभूमी विकास विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील यांच्या सहीचे पत्र खारभूमी विकास विभागाचे डेप्युटी इंजिनिअर सुधीर वेल्हाळ यांनी सरपंच सौ. प्रविणा प्रभू यांच्या कडे सुपूर्द केले. यावेळी उपसरपंच किरण पवार, माजी प. स. सदस्य प्रफुल्ल प्रभू, माजी उपसरपंच सतीश बांदिवडेकर, ग्रामपंचायत सदस्य शंकर आईर, सौ. अनुष्का परब, नरेश मसुरकर, आनंद परब, ग्रामपंचायत कर्मचारी विश्वनाथ परब, महेश हडकर आदी उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक यांनी दोन वर्षा पूर्वी भूमिपूजन केलेल्या या कामाचे एक इंच सुद्धा बांधकाम न झाल्याने ग्रामस्थां मधून नाराजी होती. बांदिवडे सह भगवंतगड, त्रिंबक ग्रामस्थांची शेकडो एकर जमीन नापीक होण्या पासून वाचविण्याची मागणी या निमित्ताने शेतकऱ्यांमधून होत होती.कालावल खाडी किनाऱ्यालगत हा बंधारा असल्याने भरतीचे खारे पाणी मोठ्या प्रमाणावर या बंधाऱ्यातून बांदिवडे, भगवंतगड, त्रिंबक या गावातील शेती क्षेत्रात प्रवेश करत आहे. त्यामुळे शेकडो एकर भातशेती योग्य जमीन नापीक होत आहे. आचरा, देवगड येथे जाण्यासाठी हा मार्ग नजीकचा असल्याने या बंधाऱ्याचा वापर होतो. तसेच भगवंतगड येथील शेतकरी बांदिवडे येथे शेती करण्यासाठी याच बंधाऱ्यावरून प्रवास करतात. ग्रामस्थांच्या सततच्या मागणीमुळे जलसंपदा विभागाकडून जानेवारी २०१९ मध्ये बांदिवडे खार भूमी योजना या शीर्षकाखाली ८८ लाख ७९ हजार रुपये अंदाजपत्रकिय रक्कम असलेली निविदा मंजूर होऊन सदर कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले होते. बेमुदत उपोषणाच्या पार्श्वभूमीवर खार भूमी विभागाच्या वतीने ५ मार्चची डेड लाइन देण्यात आल्याने तसेच कोरोना संदर्भात शासनाचे निर्बंध असल्याने बंधाऱ्याच्या ठिकाणी १ मार्च पासून जाहीर केलेले बेमुदत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच सौ प्रविणा प्रभू यांनी सांगितले.