कुडाळ तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समितीची सभा संपन्न..

कुडाळ /-

शेतकऱ्यांनी आत्मा अंतर्गत विविध घटकांचा व कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेती मध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती उत्पादनात व उत्पन्नामध्ये वाढ करावी असे आवाहन बाजीराव झेंडे, अध्यक्ष शेतकरी सल्ला समिती कुडाळ यांनी केले.आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी समितीची बैठक मंडळ कृषि अधिकारी कार्यालय, कुडाळ येथे पार पडली. या बैठकीस कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समितीचे सदस्य उपस्थित होते.

या बैठकी दरम्यान सन २०२०-२१ करिता आत्मा अंतर्गत मंजूर आराखड्याचे वाचन करून वेगवेगळे निर्णय व अंमलबजावणी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाच्या आधारावर राबवण्यात आलेली कृषी प्रात्यक्षिके विशेषता भाजीपाला लागवड, आच्छादन व ठिबक सिंचन आधारित कलिंगड लागवड, बुश मिरी,हायड्रोपोनिक्स आधारित प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांना प्रशिक्षणाच्या बाबतीत फळपीक लागवड तंत्रज्ञान, कुकूटपालन व दुग्ध व्यवसाय, विविध कृषी अवजारांची देखभाल व दुरुस्ती इत्यादी विषयावर प्रशिक्षण आयोजित करून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी सल्ला समितीने केले. तालुक्यामध्ये आत्मा अंतर्गत शेतीशाळा आयोजित करण्यात येत असून यामध्ये प्रगतिशील शेतकरी,शास्त्रज्ञ यांच्या माध्यमातून विविध फळबाग लागवड तंत्रज्ञान, कलिंगड लागवड तंत्रज्ञान, श्री पद्धतीने भात लागवड यासारख्या विषयावर शेतीशाळा आयोजित केल्या जात आहेत. या बैठकीदरम्यान शेतकरी हिताय विविध योजनांची चर्चा सुद्धा करण्यात आली. त्यामध्ये विकेल ते पिकेल या धोरणावर आधारित संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान, स्मार्ट, प्रधानमंत्री मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, कृषी यांत्रिकीकरण, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, नैसर्गिक आपत्ती, या विषयावर चर्चा करण्यात आली.श्री लॉरेन्स मान्येकर यांनी वन्य प्राण्यापासून विविध फळपिकांचे जसे की नारळ तसेच भाजीपाला व अन्यहंगामी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळण्या संदर्भात सूचना केल्या. तसेच निलेश तेंडुलकर यांनी ज्या शेतकऱ्यांच्या बागेतून विद्युत प्रवाह गेला आहे अशा या ठिकाणी बागांना आग लागून नुकसान होऊ नये याकरिता विद्युत प्रवाह लाईन साठी गार्ड लावण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्यात असे ठरविण्यात आले.

नारळ पिकाची किड व रोगामुळे नुकसान होत नारळ पिक विमा योजना कार्यान्वित करण्यासाठी ठराव संमत करण्याचे श्री. बाळकृष्ण बेळणेकर यांनी सूचित केले.या बैठकीस बाजीराव झेंडे, निलेश तेंडुलकर, बाळकृष्ण बेळणेकर, मथुरा राऊळ, मोहन जाधव, स्नेहा दळवी, रसिका राणे, विष्णू ताम्हाणेकर, दिलीप सावंत, लॉरेन्स मान्येकर, रमाकांत कांबळे तालुका कृषि अधिकारी, कुडाळ व इतर सदस्य उपस्थित होते. या बैठकीचा समारोप शेतकरी सल्ला समितिचे अध्यक्ष बाजीराव झेंडे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page