गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले गौरवोद्गार
मसुरे /-
मसुरे येथील आयुर्वेदिक चिकित्सक आणि आंतरराष्ट्रीय मधुमेह तज्ञ डॉक्टर अनिल कुमार वैद्य यांचा पणजी – मिरामार येथे महाराष्ट्र गोवा मंडळातर्फे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट आरोग्य सेवा’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. डॉक्टर वैद्य यांनी आजवर केलेल्या वैद्यकीय सेवेचा आणि मधुमेह संशोधनाचा, आयुर्वेद अभ्यासाचा आणि गोवा राज्यामध्ये अनेक भागामध्ये मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात सहकार्य केल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातुन डॉ अनिलकुमार वैद्य यांचे एकमेव नाव या पुरस्कारासाठी आणि सत्कारासाठी निवडण्यात आले होते.
या वेळी विविध क्षेत्रातील आदर्श काम करणाऱ्या देशभरातील काही व्यक्तीना गौरविण्यात आले. डॉक्टर अनिल कुमार वैद्य यांच्यासह डॉ. यशराज भुसनर, डॉ. सोनाली सेठगावकर, डॉ. शिव कार्तिक स्वामी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रसह गोवा राज्यामध्ये अनेक ठिकाणी डॉक्टर वैद्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध भागांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केलेली होती. यावेळी गोवा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी डॉक्टर वैद्य यांच्या कार्याचा विशेष गौरव करताना डॉक्टर अनिल कुमार वैद्य यांच्या सारखी रत्ने वैद्यकीय क्षेत्रातील खरी भूषणे आहेत असे सांगितले. भविष्यातही गोवा राज्यामध्ये आरोग्यविषयक जे जे सहकार्य लागेल ते देण्याचे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी बोलताना डॉक्टर अनिल कुमार वैद्य म्हणाले, आज गोवा राज्यामध्ये मला मिळालेला पुरस्कार मी माझी पत्नी कै. डॉक्टर अपर्णा नांदेडकर वैद्य आणि मला नेहमी साथ देणारे माझ्या मायभूमीतील मसुरे ग्रामस्थांना समर्पित करीत आहे. यापुढेही गोरगरीब जनतेची सेवा आरोग्य विभागाच्या माध्यमातून अविरतपणे चालू ठेवणार आहे.
या वेळी मसुरे, कोल्हापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मसुरे गावाच्या वतीनेही लवकरच डॉक्टर अनिल कुमार वैद्य यांचा गौरव करण्यात येणार आहे.