युवासिंधु फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद आणि आदर्शवत : तहसीलदार राजाराम म्हात्रे

युवासिंधु फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद आणि आदर्शवत : तहसीलदार राजाराम म्हात्रे

सावंतवाडी /-

युवासिंधु फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे कार्य अत्यंत गौरवास्पद असून समाजाप्रती त्यांनी दाखवलेली बांधिलकी ही आदर्शवत आहे. युवासिंधु फाउंडेशनच्या या अभिनव उपक्रमाला तोड नाही,असे प्रतिपादन सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी येथील नगरपरिषद सभागृहात आयोजित युवासिंधु फाऊंडेशनच्या वतीने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व युवासिंधुचे सदस्य सागर नाणोसकर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात तहसीलदार म्हात्रे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, निबंध स्पर्धेचे परीक्षक प्रा.रुपेश पाटील , फाऊंडेशनचे सागर नाणोसकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावंतवाडी नगरपालिकेतील सफाई महिला आणि पुरुष कर्मचारी यांनाही गौरविण्यात आले.
उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर म्हणाल्या की मातीचे ऋण फेडणे हे आपले आद्य कर्तव्य आहे म्हणून युवासिंधुच्या या तरुणाईने समाजाप्रती आदर्श घालून दिलेला आहे. जो आपल्या सिंधुदुर्गवासियांसाठी एक अमूल्य ठेवा आहे.
निबंध स्पर्धेचे परीक्षक प्रा.रुपेश पाटील म्हणाले की निबंध लेखन म्हणजे वाचन, मनन आणि चिंतन या त्रिसूत्रीतून केलेले लेखन असते. निबंध लेखनातून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती आणि लेखन कौशल्याची परीक्षा होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी हा कुशाग्र बुद्धिमत्तेचा आहे मात्र स्पर्धा परीक्षांमध्ये आपले विद्यार्थी मागे पडतात हीच चिंताजनक बाब आहे. आगामी काळात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची कास धरून उज्ज्वल यश संपादन करावे. त्यासाठी युवासिंधुच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जावेत, अशी अपेक्षा प्रा.पाटील यांनी व्यक्त केली.यावेळी निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी लहान गटातील दूर्वा पांढरे (प्रथम), श्रद्धा मडव (द्वितीय), करुणा मोरजकर (तृतीय), अभय गुरव (उत्तेजनार्थ) तसेच मोठ्या गटातील साईक्षा केळजी (प्रथम), तेजस परब (तृतीय), कश्मिरा गोठणकर (उत्तेजनार्थ) या यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
सावंतवाडी नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचाही सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. प्रास्ताविक युवासिंधुचे सागर नाणोसकर यांनी,सूत्रसंचालन प्रणिता कोटकर यांनी तर आभार अजित सावंत यांनी मानले.युवासिंधुचे सदस्य प्रियांका गवस, नंदिनी धानजी, समृद्धी नाटेकर, ओंकार सावंत, रामचंद्र गवस, सोमेश्वर सावंत, विराज नाईक, सचिन मोरजकर, अखिलेश कोरगावकर, रोहित निर्गुण, गुणाजी गावडे, विनय वाडकर, मुन्ना आजगावकर आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

अभिप्राय द्या..